
महापालिकेने तब्बल एक हजार मोबाईल फिवर क्लिनीक सुरु केले आहेत. एमएचएमएच अॅपमध्ये माहिती जमा करुन हे अॅप मनपातील वॉररुमशी जोडण्यात आले आहे. अॅपवरुन व्यक्ती आजारी असल्याची माहिती मिळताच त्यांना तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली जाईल. अशा प्रकारचे क्लिनीक सुरु करणारी संभाजीनगर ही देशातील पहिली महापालिका आहे, अशी माहिती प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिली आहे.
शहरातील कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी राज्य शासनाने एमआयडीसीच्या मदतीने कोविड हॉस्पिटल उभारले आहे. या हॉस्पिटलच्या लोकापर्ण कार्यक्रमाच्या निमित्याने पालकमंत्री सुभाष देसाई शुक्रवारी शहरात आले होते. यावेळी त्यांनी शहर व जिल्हयातील कोरोना रुग्णांचा आढावा घेतला. सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली. हॉस्पिटलच्या कामाचा आढावा घेण्यासाठी देसाई गेल्या आठवडयात शहरात आले होते. तेव्हा त्यांनी शहरातील सर्व ११५ वॉर्डांसाठी फिवर क्लिनीक सुरु करण्याचे आदेश दिले होते.
पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या आदेशाचे पालन करुन शहरात मोबाईल फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले आहे असे आस्तिककुमार पाण्डेय यांनी सांगितले. मोबाईल क्लिनीकसाठी एक हजार पथके तयार करण्यात आले आहेत. एका पथकामध्ये दोन कर्मचारी असतील. त्यांना ऑक्सीमीटर आणि थर्मलगन देण्यात आले आहे. त्यांनी घरोघरी जावून नागरिकांच्या शरीराचे तापमान व शरीरातील ऑक्सीजनचे प्रमाण तपासणी करावयाची आहे. त्याची माहिती एमएचएमएच अॅपवर भरायची आहे. या माहितीच्या आधारे नागरिकांना काही त्रास जाणवत असल्यास त्यांनी अॅपव्दारे माहिती द्यावी, ही माहिती महापालिकेच्या वॉररुममध्ये प्राप्त होताच या वॉररुममधील कर्मचारी संबंधित व्यक्तीची मोबाईलवरून माहिती घेवून त्यास तातडीने आरोग्य सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल. वेळेप्रसंगी आजारी व्यक्तीच्या घरी मनपाचे आरोग्य अधिकारी जातील. एकाच वेळी एक हजार मोबाईल फिवर क्लिनिक सुरु करणारी संभाजीनगर महापालिका देशातील पहिलीच महापालिका आहे असा दावा आयुक्तांनी केला आहे.




























































