
विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण घेता यावे यासाठी मालवण ग्रामपंचायतीने एक अॅप सुरू केले आहे. असे अॅप सुरू करून विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सेवा उपलब्ध करून देणारी ही देशातील बहुधा पहिली ग्रामपंचायत आहे. ‘विद्यालय’ असे या अॅपचे नाव असून मालवण पंचायत समिती येथील छत्रपती संभाजी राजे सभागृहात विद्यालय अॅप चा उदघाटन सोहळा सिंधुदुर्ग जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारीडॉ. हेमंत वसेकर यांच्या हस्ते पार पडला.
कसे असेल ‘विद्यालय’ अॅप
तिसरी ते सातवी या वर्गाचा अभ्यासक्रम स्मार्ट पीडीएफच्या माध्यमातून या अॅपद्वारे उपलब्ध करून देण्यात आला आहे. सोबतच स्वाध्यायसाठीचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विषयाच्या अधिक माहितीसाठी युट्युब लिंक देण्यात आल्या आहेत, ज्याद्वारे व्हिडीयोरुपात विद्यार्थ्यांना माहिती मिळेल. या अॅपची विशेष बाब ही आहे की ते ऑफलाईनही काम करत राहाते. अॅप डाऊनलोड करण्यासाठी इंटरनेटची गरज असते. त्यानंतर इंटरनेट उपल्बध नसले तरी ऑफलाईन पद्धतीने विद्यार्थी शिकू शकतात. याचा अधिक फायदा इंटरनेटसेवा नसलेल्या किंवा सतत खंडीत होणाऱ्या भागांमध्ये होऊ शकेल. हे अॅप लवकरच गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
अॅप साकारणारे तंत्रस्नेही शिक्षक व तंत्रज्ञ यांचा सन्मान
मालवण पंचायत समितीचे शिक्षणप्रिय सभापती अजिंक्य पाताडे व उपसभापती राजू परुळेकर यांनी या अॅपची संकल्पना मांडली होती. गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी हे अॅप प्रत्यक्षात उतरवले. मालवण शिक्षण विभागाचे तंत्रस्नेही शिक्षक अमर वाघमारे, विनीत देशपांडे, गुरुनाथ ताम्हणकर, परशुराम गुरव, दिनकर शिरवलकर, भागवत अवचार यासह तंत्रज्ञ नंदकिशोर हळदणकर यांनी या अॅपची रचना केली आहे. या टीमचा विशेष सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. हे सातही शिक्षणवीर असून त्यांनी इंग्लिश स्पिकिंग डे हा उपक्रम शाळा स्तरावर यशस्वीरित्या राबविला होता.
जिल्हापरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी ‘मल्टीटॅलेंटेड पराडकर’ यशा शब्दात उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा मालवण गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर यांचे कौतुक केले. जिल्ह्याच्या प्रमुख अधिकाऱ्याने केलेले हे कौतुक मालवण तालुक्यासाठी अभिमानस्पद म्हणावे लागेल. “राजेंद्र पराडकर जिथे गटविकास अधिकारी म्हणून काम करतात तिथे नाविन्यपूर्ण उपक्रम संकल्पना यशस्वी करणे शक्य” असते असं शिक्षण सभापती सावी लोके यांनी म्हटले आहे.



























































