मुसळधार पावसामुळे गोव्यात जनजीवन विस्कळीत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यामध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी रात्रीपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या, नाले ओसंडून वाहत आहेत. तसेच अनेक ठिकाणी पाणी साचल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. राजधानी पणजीमध्येही अनेक ठिकाणी पाणी साचल्याने शहराला तळ्याचे स्वरूप आले आहे.

सोमवारी रात्रीपासून गोव्यात जोरदार पाऊस कोसळत आहे. मंगळवारी सकाळी पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. त्यानंतर पावसाने सकाळी 11वाजता पुन्हा जोर धरला. सलग दोन तास झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले. नद्या,नाले दुथडी भरून वाहत असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे. राजधानी पणजीला तर तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. सगळे रस्ते गुडघाभर पाण्यात बुडाले होते. पणजी मनपाचे महापौर उदय मडकईकर भर पावसात मनपाचे कामगारांसह साचलेल्या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी प्रयत्न करत होते. दुपारी 1 वाजेनंतर पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, वातावरण ढगाळ असून पुन्हा जोरदार पाऊस झाल्यास, पुन्हा पाणी भरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.