
हिंदुस्थान आणि चीनच्या सैन्यात लडाखमधील गलवान खोऱ्यात झालेल्या रक्तरंजित संघर्षाला 36 तास पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मौन सोडले आहे. हिंदुस्थानच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही. देशाची सुरक्षा सर्वोच्चस्थानी आहे. आमच्या देशाचे संरक्षण करण्यास आम्हाला कोणीही रोखू शकत नाही. याबाबत कोणाच्याही मनात संशय किंवा भ्रम असू नये, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. बुधवारी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना हे विधान केले.
पंतप्रधान पुढे म्हणाले, हिंदुस्थानला शांतता हवी आहे, मात्र आम्हाला भडकवण्याचा प्रयत्न केल्यास त्याला योग्य ते प्रत्युत्तर देण्यास आम्ही सक्षम आहोत. आमचे जवान मारता मारता हुतात्मा झाले याचा देशवासियांना गर्व असेल, असेही मोदी म्हणाले. तसेच यावेळी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये सहभागी झालेल्या सर्व मुख्यमंत्र्यांना 2 मिनिटं उभे राहून हुतात्मा झालेल्या वीर जवानांना श्रद्धांजली वाहण्याचे आवाहन केले.
19 जूनला सर्वपक्षीय बैठक
गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षात हिंदुस्थानने 20 वीर जवान गमावले. हिंदुस्थान आणि चीनमध्ये अद्यापही येथे तणावाची स्थिती आहे. याच मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांनी 19 जूनला सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत सर्वपक्षीय नेत्यांना सीमेवर सद्यपरिस्थितीची माहिती देण्यात येईल.
India China Clash – सोमवारी रात्री ‘तिथे’ नक्की काय घडलं? वाचा सविस्तर…




























































