आतापर्यंत धारावीत 1,053 रुग्ण कोरोनामुक्त, पॉझिटिव्ह रुग्णांची संख्याही घटली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या अर्ध्यावर आली आहे.  धारावीत सध्या 2,106 कोरोना रुग्ण असून त्यापैकी आतापर्यंत 1,053 कोरोनामुक्त झाले आहेत. त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येतही मोठी घट आली आहे तर आतापर्यत 78 जणांचा मृत्यू झाला आहे.

धारावीत अत्यंत दाटीवाटीने वेढलेली घरे असल्यामुळे कोरोनाचा प्रसारही या परिसरात वेगाने झाला. मात्र, राज्य सरकार आणि पालिका प्रशासनाने जोरदार मोहीम राबवत कोरोनाच्या प्रसाराला आळा घालण्यात यश मिळवले. मिशन धारावीअंतर्गत फिव्हर क्लीनिक, आयसोलेशन आणि कोरेन्टाईन व्यक्तींसाठी कोरोना सेंटर्स, घरोघरी जाऊन तपासणी, ज्येष्ठांच्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण शोधण्यासाठी विशेष मोहीम राबवली गेली. कोरोना रुग्णांना जास्तीत जास्त वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ते लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी पूर्णवेळ पाच रुग्णालये तसेच पालिका, खासगी शाळा, क्रीडा संकुलामध्ये आयसोलेशन आणि कोरेन्टाईन व्यवस्था करण्यात आली. धारावीतील कोरोना रुग्णांना शोधून त्यांना आयसोलेट करणे आणि त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्तींना तातडीने कोरेन्टाईन करणे, यामुळे रुग्ण संख्या कमी झाली असून मृत्यू दरही कमी झाला आहे.

“आपण लॉकडाऊनविषयी खूप बोललो, आता…”, पंतप्रधानांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मुख्यमंत्र्यांची चर्चा

डबलिंग रेट 48 दिवसांवर
धारावीत कोरोनाचा संसर्ग जरी मोठ्या प्रमाणात झाला तरी मिशन धारावीमुळे त्याला नियंत्रित करण्यास पालिकेला यश मिळाले आहे. याचाच परिणाम म्हणून धारावीत आता एकापासून दुसऱ्याला कोरोनाचा संसर्ग होण्याचा डबलिंग रेट 48 दिवसांवर आला आहे. त्याचबरोबर दर दिवशी कोरोना संसर्ग होण्याचे प्रमाणही 1.6 टक्क्यांवर आले आहे. दरम्यान, मुंबईत कोरोना रुग्णांचा डबलिंग रेट आता 29 दिवसांवर आला असून त्याचे प्रमाण 2.43 टक्के इतके आहे.

17 पैकी 13 दिवसांत एकही मृत्यू नाही!
धारावीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, खासगी आणि क्रीडा संकुलात कोरोना रुग्णांवर सुरू असलेले उपचार, रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या व्हिटॅमिन्स आणि पूरक आहार, डॉक्टर्स, परिचारिका यांच्याकडून मिळणारी सेवाश्रुश्रुषा यामुळे रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण जास्त आहे. ज्येष्ठ तसेच इतर आजारपणामुळे ग्रस्त असलेल्या व्यक्ती कोरोनाच्या बळी ठरल्या आहेत. जून महिन्यात गेल्या 17 दिवसात धारावीत केवळ पाच जणांचा मृत्यू झाला आहे तर 13 दिवसांत एकही मृत्यू झाला नाही.