महाराष्ट्रातील चार तरुणांनी शोधली पालीची नवी प्रजात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील चार तरुणांनी पालींच्या नवीन प्रजातीचा शोध लावला आहे. कर्नाटकच्या सकलेशपूर भागातील जंगलात उभ्या शिळांमध्ये या पाली आढळून आल्या आहेत. हिंदुस्थानात आढळणाऱया 50 पालींच्या प्रजातींपेक्षाही ही वेगळी प्रजात तिचा रंग, डोळ्यांची बुबुळे, शरीररचनेमुळे तिच्यातील वेगळेपणा प्राणीतज्ञांसाठी कुतूहलाचा विषय ठरला आहे. अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, सौनक पाल, इशान अगरवाल या चार तरुण संशोधकांनी या पालीचा शोध घेतला आहे. ‘मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको’ असे या पालीचे नामकरण करण्यात आले असून चौघांनी या पालीवर तयार केलेल्या शोधनिबंधाला आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या ‘झुटाक्सा’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्धी मिळाली आहे.’

‘मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको’ ही पाल अन्य प्रजातींपेक्षा कशी वेगळी आहे हा संशोधनाचा टप्पा आव्हानात्मक होतो. 2014 सालीच या पाली कर्नाटकच्या सकलेशपूरमध्ये या तरुणांना सापडल्या होत्या. मात्र हिंदुस्थानात सापडणाऱया 50 प्रजातींपैकी ही पाल कशी वेगळी आहे हे शोधणे आव्हानात्मक होते. यासाठी इतक्या वर्षांचा काळ जावा लागल्याचे संशोधक अक्षय खांडेकर यांनी सांगितले. याचे कारण म्हणजे पालींच्या नमुन्यांची नोंदच उपलब्ध होऊ शकली नाही. त्यामुळे ज्या 50 प्रजाती आधीच आहेत त्यांचे नमुने गोळा करणे त्यांच्याशी या पालीची तुलना करणे आव्हानात्मकच होते. 2018 मध्ये पश्चिम घाटांतून हे नमुने जमा करून त्यांची तुलना या पालीसोबत करण्यात आली. पालीची शरीररचना आणि जनुकीय अभ्यासाअंती ही प्रजात वेगळी असल्याचे आढळून आले. या पालीच्या वैशिष्टय़ांविषयीचा शोधनिबंध तयार करून दोन महिन्यांपूर्वी तो पडताळणीसाठी आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या झुटाक्सा नियतकालिकाला दोन महिन्यांपूर्वी पाठविण्यात आला. अखेर हा शोधनिबंध या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाला असे अक्षय खांडेकर यांनी सांगितले. या संशोधकांपैकी अक्षय खांडेकर, तेजस ठाकरे, इशान अगरवाल यांचे ठाकरे वाइल्ड लाइफ फाऊंडेशनच्या माध्यमातून संशोधन सुरू आहे. तर सौनक पाल हे ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’च्या माध्यमातून संशोधन करीत आहेत.

akshay-khandkekar

रात्रीची शोधमोहीम
निमास्पिस जातीच्या पाली या प्रामुख्याने दिवसा आढळतात मात्र ‘मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको’ ही पाल रात्रीच्या वेळी सक्रिय होते. जसा अंधार पडू लागतो तशी ही पाल सक्रिय असल्याने जंगलात रात्रीच्या वेळी तिचा शोध घ्यावा लागला. रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत टॉर्चच्या प्रकाशात शोधमोहीम सुरू असायची असे खांडेकर यांनी सांगितले.

पालीची नवी प्रजात
लॅटिन भाषेत निमास्पिस मॅग्निफिका तर इंग्रजीत मॅग्निफिसंट ड्वार्फ गेको असे पालीचे नामकरण करण्यात आले. तिची लांबी 58 मिलीमीटर आहे. अन्य जातींच्या पालींत आढळणारे पोटाच्या भागाकडील टोकदार खवल्यांचा अभाव आणि नराच्या मांडीवर असलेल्या ग्रंथींच्या फरकांमुळे ही पाल अन्य प्रजातींपेक्षा वेगळी ओळखली जाऊ शकली.