नाशिक- दोन दिवसात 139 नवे कोरोनाग्रस्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला असून, दोन दिवसात 139 नवे रूग्ण आढळले आहेत. यात सर्वाधिक 122 रूग्ण एकट्या नाशिक शहरातील असल्याने कोरोना संसर्ग रोखण्याचे मोठे आव्हान यंत्रणेसमोर उभे ठाकले आहे.

नाशिक जिल्ह्यात गुरूवारी 120 रूग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते, तर आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालांपैकी 19 रूग्ण हे कोरोनाबाधित आढळले आहेत. दोन दिवसातील या एकूण 139 रूग्णांमध्ये सर्वाधिक 122 रूग्ण नाशिक शहरातील आहेत. पेठरोडचे रामनगर, दत्तनगर, भराडवाडी, वडाळा रोड, जुने नाशिक, खडकाळी येथील रूग्णसंख्या जास्त आहे. शहरातील 150 प्रतिबंधित क्षेत्रांमधील उपाययोजनांवर महापालिका अधिक भर देत आहे.

नाशिक शहरापाठोपाठ सटाणा, येवला, नाशिक तालुका, नांदगाव, इगतपुरी, निफाडमध्येही अधिक रूग्ण असल्याने या तालुक्यांमधील चिंता वाढली आहे. जिल्ह्यातील एकूण रूग्णसंख्या आता 2441 इतकी झाली आहे. त्यात अॅक्टिव्ह रूग्ण 804 आहेत. नाशिक शहर- 531, नाशिक ग्रामीण- 195, मालेगाव- 67 आणि जिल्ह्याबाहेरील 11 रूग्णांवर रूग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.