
चिनी लालमाकडांच्या कुरापती वाढल्या असून, गलवान खोरे बळकावण्याचा डाव आखला आहे. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने यासंदर्भात दावा करताना प्रत्यक्ष ताबा रेषेच्या (एलएसी) आमच्या बाजून गलवान खोरे असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, हिंदुस्थानने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
पुर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात सोमवारी हिंसक संघर्ष झाला. त्यात हिंदुस्थानी लष्कराचे 20 जवान शहीद झाले. हिंदुस्थानी जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले, त्यात 43 चिनी सैनिक ठार झाले. या हिंसक संघर्षामुळे हिंदुस्थानात तीव्र संताप व्यक्त असतानाच चीनचे चिथावणीखोर वक्तव्ये सुरूच आहेत.
चीनने काय म्हटले
– चीनच्या परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते झाओ लिंजियान यांनी आज गलवान खोरेच आपले असल्याचा दावा केला आहे.
– गलवान खोरे हे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या चीनच्या बाजूने आहे. अनेक वर्षांपासून येथे चीनी सैनिकांचे पेट्रोलिंग सुरू आहे.
– दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्यासाठी कमांडर स्तरावरील दुसरी बैठक लवकर व्हायला हवी. राजनैतिक आणि लष्करी चर्चेतून तणाव कमी केला जाईल, असेही लिंजियान यांनी म्हटले आहे.
हिंदुस्थानने फेटाळला चीनचा दावा
गलवान खोऱयाबाबत चीनने केलेला दावा हिंदुस्थानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी फेटाळून लावला आहे. चीनचा दावा पूर्णपणे अमान्य आहे. हिंदुस्थानी लष्कराला ‘एलएसी’ची पूर्ण माहिती आहे. त्यामुळे चीनने भलते दावे करू नये. आमचे लष्कर आपल्या हद्दीत अनेक वर्षांपासून गस्ती घालत आहेत. ‘एलएसी’चे उल्लंघन आम्ही केलेले नाही. कोणी आगळीक केली तर योग्य प्रत्युत्तर देण्यास हिंदुस्थानी लष्कर समर्थ आहे, असा इशारा श्रीवास्तव यांनी दिला आहे.
The Indian side has never undertaken any actions across the LAC. In fact, they have been patrolling this area for a long time without any incident. All infrastructure built by the Indian side is naturally on its own side of the LAC: MEA #GalwanValleyFaceOff
— ANI (@ANI) June 20, 2020
























































