विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य, शिक्षण वाऱ्यावर, अवाच्या सवा फी घेणाऱया ’केजी’साठी मार्गदर्शक सूचना जारी करा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील पूर्व प्राथमिक शाळा, बालवाडी, अंगणवाडी, नर्सरी, प्ले गुपसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी युवासेनेने महिला व बालविकास विभागाकडे केली आहे. शालेय शिक्षण विभागाने 15 जून रोजी नवीन शैक्षणिक वर्षासाठी जाहीर केलेल्या अध्यादेशात पूर्व प्राथमिक वर्गांसाठी कोणत्याही सूचना नव्हत्या. या वर्गात शिकणाऱया लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षा आणि आरोग्याची दखल घेत युवासेनेने सदर मागणी केली आहे.

पूर्व प्राथमिकचे शिक्षण देणाऱया बालवाड्या, नर्सरी, प्ले गुप ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली पालकांकडून अवाच्या सव्वा फी वसूल करीत आहेत. याविषयी अनेक पालकांनी युवासेनेकडे तक्रार केली आहे. या तक्रारींची दखल घेत राज्याचे मंत्री शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना सचिव वरूण सरदेसाई, युवासेना कोअर कमिटी सदस्य साईनाथ दुर्गे यांनी महिला व बालविकास मंत्री यशोमती चंद्रकांत ठाकूर यांच्याकडे केजीच्या वर्षांसाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्याची मागणी केली आहे. राज्यात 1 मार्चपासून पूर्व प्राथमिक शिक्षण धोरण कार्यपद्धती व नियमावली लागू आहे. त्यानुसार विभागाने कार्यवाही करून विद्यार्थ्यांची सुरक्षा, आरोग्य, शिक्षण याविषयी योग्य धोरण ठरवावे, अशी मागणी युवासेनेच्या वतीने करण्यात आली आहे.