गुहागर- वाहनचालकांना पर्यायी रस्ते ठरले डोकेदुखी, घसरगुंडीने दुचाकीस्वारांचे अपघात वाढले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गुहागर तालुक्यात वाहनप्रवास सध्या वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरला आहे. लॉकडाऊनमुळे गेले दोन महिने बंद असलेले रस्ता रुंदीकरणाचे कामही भर पावसाळ्यात सुरु झाल्याने अनेक वाहनचालकांनी शक्कल लढवत गावागावांतून अतंर्गत पर्यायी रस्तेही काढले. कित्येक गावांना वळसा मारुन वाहनचालकांनी हे रस्ते निवडले असले तरी सध्या त्यांचा हा प्रवास ‘काखेत कळसा, गावाला वळसा’ या उक्तीनुसार ठरला आहे. त्यातच हे रस्ते कच्चे लाल मातीचे असल्याने त्यावर घसरगुंडी होऊन विशेष करुन दुचाकीस्वारांचे मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचे समोर येत आहे.

गुहागर-विजापूर महामार्ग जानेवारी महिन्यात रुंदीकरणाला सुरुवात करताना ठेकेदाराने दोनही बाजूने रस्ता उकरुन त्याच्या एका बाजूने रुंदीकरण केले. मात्र, उकरलेली दुसरी बाजू तशीच ठेवली. त्यातच गेले तीन महिने लॉकडाऊन असल्याने हे रुंदीकरण कचाट्यात सापडून संपूर्ण काम बंद पडले. त्यामुळे रुंदीकरण रखडले. मात्र, भर पावसाळ्यात या रुंदीकरणाला सुरुवात झाली आणि लाल मातीचा चिखल होऊन रस्ता निसरडा झाला. त्यातच महामार्गाला जोडणारे अंतर्गत गावांचे रस्ते समांतर नसल्याने वाहनांना चढ-उतार करणे, वाहने घसरणे असे प्रकार सुरु झाले आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरण आजही वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.

यात कमी म्हणून की काय, सध्या गुहागरचा प्रवास खूपच डोकेदुखी ठरला आहे. गुहागर तालुक्यात प्रवेश करताच देवघरच्या पुढे गुहागरच्या दिशेने रस्ता रुंदीकरण सुरु झाल्याने वाहतुकीची कोंडी नको म्हणून झोंबडी फाट्यानजीक ब्रँकेट लावून खासगी वाहनांची वाहतूक झोंबडी फाटामार्गे काळसूरकौंढर, वेळंब व्हाया शृंगारतळी अशी करण्यात आली आहे. त्यामुळे झोंबडी फाट्यापासूनच वाहनचालकांना पर्यायी रस्त्यांवरील वाहतुकीला सामोरे जावे लागताना दिसत आहे. पुढे गुहागरला जाण्यासाठी वाहनचालकांच्या मागे साडेसातीच लागली आहे. मोडकाघर पुलाचे काम सुरु असल्याने शृंगारतळी-पालपेणे-रानवी फाट्यामार्गे असा लांब पल्ल्याचा 15 कि.मी.चा वाढीव मार्ग वाहतुकीसाठी आहे.

मात्र, वेळ व पैशाची बचत करण्यासाठी अनेकांनी गुहागरला जाण्यासाठी दोन पर्यायी कच्चे लाल मातीचे रस्ते निवडले. यातील एक रस्ता हा पाटपन्हाळे बसथांब्यापुढील उजव्या बाजूने जातो तर दुसरा मोडकाघर पुलाच्यापूर्वी काही अंतरावरील उजव्या बाजूने जातो. हे दोनही रस्ते लाल मातीचे कच्चे व निमुळते असूने ते वरवेली गावातून बाहेर पडतात व मोडकाघरला येऊन मिळतात. हे दोनही रस्ते सध्या पावसाळ्यात धोकादायक बनले आहेत. रस्त्यावर लाल मातीचा चिखल, खड्डे, दोनही बाजूने झाड, घनदाट जंगल व वन्य प्राण्यांचा मुक्त संचार त्यातच दुचाकीस्वारांची घसरगुंडी होत असल्याने अपघातही वाढले आहेत. त्यामुळे हे दोनही रस्ते वाहतुकीला त्रासदायक ठरले आहेत.

मोडकाघर पूल दुरुस्ती कासवगतीने मोडकाघर पूल जुनअखेर पूर्ण होईल असे आश्वासन संबंधित ठेकेदाराने दिले होते. मात्र, या पुलाची पाहणी केली असता, अद्याप पुलाच्या तळाच्या भिंतीही बांधून झालेल्या नाहीत. तसेच पावसाळा सुरु झाल्याने व हा धरणाच्या जलाशयाचा भाग असल्याने बांधकामात अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वशिष्ठी, जगबुडीसारख्या नदीवर पुलाचे छत रेडीमेड टाकण्यात आलेले आहेत मात्र, मोडकाघर पुलाचे छत पूर्णतः बांधण्यात येणार असल्याने या पुलाच्या उभारणीला खूपच उशिर होणार असल्याचे यावरुन स्पष्ट होत आहे.