कोरोनाची दुसरी लाट सुरू होणार? जागतिक आरोग्य संघटनेचा धोक्याचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

जगभरात कोरोनाचे थैमान सुरू आहे. जगातील सुमारे 200 देशांमध्ये कोरोना फैलावत आहे. कोरोना रोखण्यासाठी अनेक देश विविध उपाययोजना करत आहेत. कोरोनावर लस आणि औषधे शोधण्याचे कामही वेगात सुरू आहे. मात्र, अद्याप त्यात यश आलेले नाही. त्यामुळे कोरोनाचे संकट गंभीर झाले असतानाच जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इशारा दिला आहे. सुमारे 81 देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे. चीनच्या वुहान शहरातून जगभरात हा व्हायरस पसरला होता. आता पुन्हा वुहानमध्येच कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे चीनमधील बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. त्यामुळे चीनसह इतर 81 देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याचा इशारा डब्लूएचओने दिला आहे.

दक्षिण आशिया, मध्य पूर्व आशिया आणि आफ्रिकन देशांमधील कोरोनाचे संकट अधिक गंभीर होणार असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे. आफ्रिकन देशांमध्ये तीन महिन्यांत एक लाखांपेक्षा जास्त कोरोनाबाधित आढळले होते. मात्र, आता 20 दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट झाली आहे. 36 देशांमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाली असली तरी जगात कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्यास कोरोनाचा उद्रेक होण्याची भीती व्यक्त होत आहे. जगभरात कोरोनाबाधितांची संख्या 90 लाखांच्या घरात गेली आहे. तर 4 लाख 67 हजार जणांचा मृत्यू झाला आहे. तर, 47 लाख रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोनाबाधितांची वाढणारी संख्या चिंता वाढवणारी असल्याचे मतही आरोग्य संघटनेने व्यक्त केले आहे.

चीनमध्ये कोरोनाचे 34 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यातील 22 जण राजधानी बीजिंगमधील आहेत. या नव्या 34 रुग्णांपैकी सात जणांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. त्यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्ण शोधणे अधिक कठीण होणार आहे. शुक्रवारपर्यंत बीजिंगमध्ये 625 रुग्ण होते. तर कोरोना पॉझिटिव्ह असलेले, मात्र कोणतीही लक्षणे नसलेल्या 17 रुग्णांना वैद्यकीय देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. त्यामुळे चीनसह दक्षिण आशिया, मध्यपूर्व आशिया आणि आफअरिकन देशांमध्ये कोरोनाची दुसरी लाट सुरू होण्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला आहे.