बोरिवलीच्या भगवती रुग्णालयात आता आयसीयू, व्हेंटिलेटर सुविधा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या बोरिवली येथील भगवती रुग्णालयात आता आयसीयू आणि व्हेंटिलेटर सुविधा सुरू झाली आहे. आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले यांच्या हस्ते या सुविधेचे सोमवारी लोकार्पण करण्यात आले. शिवसेनेच्या पाठपुराव्यातून झालेल्या या सुविधेमुळे विभागातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी मोठी सुविधा निर्माण झाली आहे.

भगवती रुग्णालयात मार्चपासून 69 खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले. या ठिकाणी आयसीयू आणि व्हेंटिलेटरची सुविधा सुरू करावी अशी मागणी विभागप्रमुख आमदार विलास पोतनीस, विधी समिती अध्यक्षा शीतल म्हात्रे, प्रभाग समिती अध्यक्षा संध्या दोशी यांनी पालिका प्रशासन, महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे केली होती. दरम्यान, भगवती रुग्णालयातील ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सुविधेकरिता आमदार विलास पोतनीस यांनी दहा लाखांचा निधीही जाहीर केला आहे. भगवती रुग्णालयात आतापर्यंत ३७६ कोविड रुग्ण दाखल झाले असून 279 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. भगवती रुग्णालयातील आयसीयू आणि व्हेंटिलेटर सुविधेच्या लोकार्पणप्रसंगी आमदार प्रकाश सुर्वे, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, भगवती रुग्णालयाच्या डॉ. प्रतिमा पाटील, डॉ. नंदकुमार वाडे, नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद, हर्षद कारकर, सुजाता पाटेकर, रिद्धी खुरसुंगे, गीता सिंघण, माधुरी भोईर, मुंबई बँक संचालक अभिषेक घोसाळकर, विधानसभा प्रमुख उदेश पाटेकर, उपविभागप्रमुख भालचंद्र म्हात्रे, दामोदर म्हात्रे, विनायक सामंत, पांडुरंग देसाई, अविनाश लाड, कर्णा अमिन, शाखाप्रमुख भूपेंद्र कवळी आदी उपस्थित होते.