
पालिकेने वरळी एनएससीआय कोरोना हेल्थ केंद्रात सुरू केलेल्या देशातील पहिल्याच कंटेनर आयसीयू बेडचे सोमवारी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापौर किशोरी पेडणेकर, वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख हेदेखील उपस्थित होते. या अत्याधुनिक सुविधेमध्ये डॉक्टरचा रुग्णाशी थेट संपर्क येणार नसून रिमोट कंट्रोलने रुग्णाला हाताळता येणार आहे. रुग्णाला न भेटता उपचार करता येणार आहेत.
रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देण्यासाठी कंटेनरमध्ये बेड सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार कंटेनरमध्ये दोन बेडचे आयसीयू केंद्र वरळी येथील नॅशनल स्पोर्ट्स क्लब ऑफ इंडिया येथे उभारण्यात आले आहे. यावेळी बोलताना पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, पालिकेच्या वतीने आपण ही अत्याधुनिक सुविधा पहिल्यांदाच उपलब्ध करून दिली आहे. या सुविधेचे वैशिष्ट्य म्हणजे, आयसीयूमधील रुग्णाला डॉक्टरांना बाहेरून रिमोट कंट्रोलद्वारे हाताळता येणार आहे. डॉक्टरने रुग्णाला न भेटता रुग्णांवर योग्य ते उपचार करणे शक्य होणार आहे. त्याचप्रमाणे वीस बाय दहा फूट आकारांमध्ये कंटेनरमधील हे दोन बेडचे आयसीयू युनिट असून सर्व अत्याधुनिक सोयी सुविधांचा यामध्ये समावेश आहेत. लवकरच इतरत्र ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.’ या आयसीयू केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी खासदार अरविंद सावंत, आमदार अमीन पटेल, आरोग्य समिती अध्यक्ष अमेय घोले, स्थानिक नगरसेवक दत्ता नरवणकर, सहाय्यक आयुक्त शरद उघडे, डॉ. मुजफल लकडावाला, डॉ. राजीव जोशी, डॉ. नीता वरठी आदी मान्यवर उपस्थित होते.






























































