
विविध गुन्ह्यांची उकल करण्यात अत्यंत मोलाची कामगिरी बजाविणाऱ्या पुण्यातल्या प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेला (फॉरेन्सिक लॅब) मागील साठ वर्षांत प्रथमच राज्याच्या गृहमंत्र्यांनी भेट दिली. या लॅबचे काम खूप महत्त्वपूर्ण व कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार अनिल देशमुख यांनी या भेटीच्या दरम्यान काढले.
गृहमंत्र्यांनी शुक्रवारी या प्रयोगशाळेस भेट दिली आणि प्रयोगशाळेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसोबत चर्चा केली. तसेच त्यांच्या कामाची पध्दत अडीअडचणी याबद्दल माहिती घेतली. यावेळी प्रादेशिक न्यायसहाय्यक वैज्ञानिक प्रयोगशाळेचे उपसंचालक राजेंद्र कोकरे यांनी या प्रयोगशाळेतील कार्याविषयी माहिती दिली. संगणक गुन्हे, ध्वनी व ध्वनीफीत विश्लेषण, जीवशास्त्र, डीएनए, विषशास्त्र, सामान्य विश्लेषण व उपकरणे, आणि दारूबंदी व उत्पादन शुल्क विभागामध्ये करण्यात येणाऱ्या कामकाजाची त्यांना सविस्तर माहिती देण्यात आली.




























































