मुंबईत 6 कंटेनमेंट झोन रद्द; 129 सील इमारतींवरील बंदी उठवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

कोरोना रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकार अहोरात्र मेहनत करत असून रुग्णसंख्येबरोबरच आता कंटेनमेंट झोन आणि सील इमारतींमध्ये घट झाली आहे. गेल्या चार दिवसांत 756 कंटेनमेंट झोनची संख्या कमी होऊन 750 झाली आहे तर 6,006 सील इमारतींची संख्या 129ने कमी होऊन ती 5 हजार 875 झाली आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिका कंटेनमेंट (प्रतिबंधित क्षेत्र) जाहीर करून तिथे कडक पोलीस बंदोबस्त ठेवत असे तसेच कोरोनाचा रुग्ण ज्या परिसरात आढळत असत तो परिसर सील करण्यात येत असे. परंतु भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या (आयसीएसआर) मार्गदर्शक तत्त्वानुसार, पालिका आयुक्तांनी नियमात बदल करून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिकेने कंटेनमेंट झोन आणि सील इमारती अशी विभागणी करून त्यानुसार उपाययोजना आखल्या आहेत. कोरोना रुग्ण आढळलेले घर अथवा इमारतीचा मजला सील करण्यात येत आहे तर जास्त संसर्ग असलेला परिसरच कंटनेमेंट झोन म्हणून जाहीर करण्यात येत आहे. यामुळे पालिका तसेच पोलीस कर्मचाऱ्यांच्या कामाचे योग्य नियोजन आणि विभागणी झाली. त्यामुळे योग्य दिशेने अधिक गतीने हे कर्मचारी काम करत आहेत तसेच त्यांच्यावरील ताणही कमी झाला आहे. यामुळे गेल्या चार दिवसांत कंटेनमेंट झोन आणि सील इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे.

  • सर्वाधिक कंटेनमेंट झोन – ‘एल’ विभाग – 96
  • सर्वात कमी कंटेनमेंट झोन – ‘बी’ विभाग – 5
  • सर्वाधिक सील इमारती – ‘आर/मध्य’ – 636
  • सर्वात कमी सील इमारती – ‘ई’ विभाग – 39