
मागील 18 मार्चपासून कोरोना संकटामुळं बंद असलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प 1 जुलैपासून सुरू होत असून, हे पर्यटन केवळ बफर क्षेत्रातच असणार आहे. कोअर झोनमध्ये पर्यटन पूर्णपणे बंद राहणार आहे. इथल्या लोकांवर ओढवलेली परिस्थिती बघता होम स्टे संघटनेनं आणि स्थानिकांनी प्रकल्प अंशतः तरी सुरू करावा, अशी मागणी शासनाकडे लावून धरली होती. त्याला यश आलं असून, बडूव्हारपासून पुन्हा ताडोबाच्या बफर झोनमध्ये पर्यटकांची गजबज दिसणार आहे.
प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात असलेल्या एकूण 13 प्रवेशद्वारातून रोज पर्यटक वाहनं सोडली जाणार आहेत. एका द्वारातून रोज सकाळी सहा आणि सायंकाळी सहा अशी बारा वाहनं सोडली जाणार आहेत. हे पर्यटन सुरू करताना ताडोबा व्यवस्थापणानं काही अटी घातल्या आहेत. प्रत्येक पर्यटकास मास्क आवश्यक असून, जिप्सीही निर्जंतुक कारण अनिवार्य केलं आहे. प्रत्येक पर्यटकाची थर्मल स्क्रिनिंग होईल. त्यानंतरच प्रवेश दिला जाईल. यासोबतच सुरक्षेच्या इतर नियमांचं पालन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पर्यटकांसाठी ऑनलाईन बुकिंग बंद असून, थेट प्रवेशद्वारातून तिकीट दिले जाणार आहे. पर्यटनावर रोजगार असलेल्या आणि पर्यटनासाठी आसुसलेल्या लोकांसाठी ही पर्वणी मानली जात आहे.

































































