सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 ते 8  जुलैपर्यंत लॉकडाऊन, सायंकाळी 5 ते सकाळी 9 पर्यंत कर्फ्यू

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सिंधुदुर्गात दरदिवशी एक हजाराच्या आसपास मुंबईकर येत आहेत. परिणामी जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 214 वर पोहचली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाचा काढता आलेख रोखण्यासाठी 2 ते 8 जुलै या कालावधीत संपूर्ण जिल्हा लॉकडाऊन ठेवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या काळात पूर्कीसारखा कडक पोलीस बंदोबस्त राहील, असेही जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांनी यांनी स्पष्ट केले.

जिल्ह्यातून पर राज्यात जाणार्‍या नागरिकांना  ईपास घेऊन रत्नागिरी रेल्वे स्टेशनपर्यंत पोहचता येईल. तसेच अत्यावश्यक परिस्थितीतच नागरिकांनी बाहेर पडावे. मात्र कोणत्याही अत्यावश्यक कारणाशिवाय आढळल्यास पोलीस कारवाई करण्यात येईल. पूर्वीप्रमाणे गुन्हे दाखल होतील व वाहनजप्तीची कारवाई होईल असेही जिल्हा पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले. प्रशासनाच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त आणि पोलीस कार्यवाही होणार आहे, असेही ते म्हणाले.

या पार्श्वभूमीवर मंगळवारी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पत्रकार परिषद घेत माहिती दिली. यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी हेमंत कसेकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. धनंजय चाकुरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी महेश खलिफे, आदी उपस्थित होते.

लॉकडाऊन कालावधीत सायंकाळी 5 ते सकाळी 9 वा पर्यंत कर्फ्यू लाकण्यात आला आहे. या कालावधीत कोणी घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आले आहे. फळे, भाजी, दुध, मासे, औषध, किराणा आदी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने आणि बाजारपेठा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात येत आहेत. कारणाशिकाय अनावश्यक लोक बाहेर पडू नये, दुकाने आणि बाजारपेठांमधे सध्या होणारी गर्दी थांबवावी या हेतूने हे लॉकडाऊन करण्यात येत आहे. कृषी विषयक कामे व सेवाही सुरू राहणार आहेत. नागरिकांनी या कोरोना साथीची या जिल्ह्यात होणारी वाढती रुग्णसंख्या रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकार्‍यांनी केले आहे.

रत्नागिरीत आणखी 19 पॉझिटिव्ह

रत्नागिरी जिल्ह्यात मंगळवारी सायंकाळपासून 19 रुग्णांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 599 आहे. कोव्हीड केअर सेंटर, केकेव्ही दापोली येथून 2 रुग्णांना बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांची संख्या 439 झाली आहे. हर्णे बाजार पेठ येथील एका 68 वर्षीय रुग्णाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.