
कोरोनामुळे जग, देश तसेच महाराष्ट्रावर मोठे संकट आले आहे. कोरोनाचे हे संकट लवकरात लवकर दूर करून महाराष्ट्रासह अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे. राज्यातील शेतकरी, वारकरी आणि अवघ्या विठ्ठलभक्तांचा प्रतिनिधी म्हणून मी आषाढी एकादशीला विठुरायाच्या दर्शनाला आलो. बळीराजाला सुखी करण्याचे आणि राज्यातील सर्व नागरिकांच्या इच्छा-आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आपणास बळ द्यावे, अशी मागणी श्री विठ्ठलाकडे केल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. पंढरपूरच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करणार आहे. त्यासाठी विकास प्रकल्पांना मंजुरी दिली जाईल. त्याबाबतचे प्रस्ताव सादर करावे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते महाराष्ट्राचे आराध्यदैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची बुधवारी पहाटे शासकीय महापूजा करण्यात आली. त्यानंतर ते बोलत होते. यावेळी पंढरपूर नगर परिषदेस शासनाच्या वतीने पाच कोटी रुपये अनुदानाचा धनादेश नगराध्यक्षा साधना भोसले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. पंढरपूर नगर परिषदेस पाच कोटी रुपये अनुदानाचा धनादेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुपूर्द केला. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे उपस्थित होते.
आषाढी एकदशीनिमित्त झालेल्या श्री विठ्ठल-रखुमाईची शासकीय महापूजा कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी सर्व नियम पाळून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सौ. रश्मी ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाली. यावेळी मंदिर समिती आणि प्रशासनाने दक्षता आणि योग्य खबरदारी घेतली होती.
विठ्ठलाच्या महापूजेनंतर देवाच्या गळ्यातील तुळशीहार काढून तो महापूजा करणाऱया दांपत्याच्या गळ्यात घातला जातो. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती प्रथाही यंदा टाळली गेली. त्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सोशल मीडियावरून टीका झाली. परंतु ती टीका व्यर्थ असून संसर्ग रोखण्यासाठी तो निर्णय घेण्यात आला असे मंदिर व्यवस्थापनाकडून स्पष्ट करण्यात आले.
आज झालेल्या महापुजेमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे यांनी दुरूनच सहभाग घेतला. महापूजेवेळी देवाच्या गाभाऱयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सौ. रश्मी ठाकरे, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, मानाचे वारकरी, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर आणि दोन पुजारी असे एकूण नऊजणच उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी गाभाऱयात तब्बल 30 मिनिटे उभे राहून देवाचे गोजिरवाणे रूप डोळे भरून पाहिले.


























































