
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत अडकून पडलेल्या मजूर, कामगार, गरजूंना मुंबई महापालिकेकडून दररोज तयार अन्नपदार्थ पाकिटांचे वाटप केले जाते. ही अन्नपाकिटे पुरवण्यासाठीचे कंत्राट आता ‘ई टेंडर’ने पद्धतीने दिले जाणार आहे, असे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगरपालिकेकडून दररोज सकाळी व संध्याकाळी गरजूंना अन्नपदार्थ पाकिटांचे वाटप केले जाते. या वाटपासाठीचे कंत्राट हे ‘ई कोटेशन’ पद्धतीने दिले जात होते. मात्र, आता ई कोटेशनने दिले जाणारे कंत्राट रद्द करण्यात आले असून ते आता ‘ई टेंडर’ पद्धतीने व संकेतस्थळाच्या माध्यमातून खुल्या पद्धतीने निविदा मागवून देण्यात येणार आहे. या अन्न पाकिटांच्या वितरणासाठी ‘ई टेंडर’ प्रक्रियेत सहभाग नोंदवण्याची कार्यवाही ही येत्या 3 जुलैपासून सुरू होणार असून 15 जुलै 2020 पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होईल, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. पालिकेकडून दररोज सुमारे 1 लाख 95 हजार अन्नपाकिटांचे वाटप केले जाते.





















































