कोरोनामुळे यंदा बाप्पाची परदेशवारी हुकली, विमान सेवा आणि शिपिंग बंदचा फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सौरभ शर्मा

मुंबईतील गणेशोत्सव ज्याप्रमाणे प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मुंबईतील मुर्तिकारांच्या गणेशमूर्तींची कीर्ती सातासमुद्रापार पोहचली आहे. लालबागच्या राजाची प्रतिपृती असो किंवा इतर अनेक प्रतिपृतीच्या गणेशमूर्ती दरवर्षी हिंदुस्थानाबाहेर जातात. यंदा मात्र कोरोनामुळे देशाबाहेरील बाप्पाची होणारी परदेशवारी हुकणार आहे. कोरोनामुळे बंद असलेल्या विमानाची उड्डाणे आणि शिपिंगच्या आलेल्या नियमांच्या कचाटय़ामुळे मुंबईतील अनेक मूर्तिकारांची मूर्ती यंदा देशाबाहेर जाणार नसल्याची माहिती मुंबईतील मूर्तिकारांनी दिली आहे.

गेल्या काही वर्षांपासून पेणप्रमाणे मुंबईतील गणेशमूर्तींची ख्याती ही सर्वदूर पसरली आहे. दरवर्षी मुंबईबाहेर परराज्यात आणि परदेशात जाणाऱया गणेशमूर्तींची संख्या मोठय़ा प्रमाणात आहे. ज्यात मुंबईतील अनेक मूर्तिकारांच्या मूर्ती अमेरिका, लंडन, वेस्ट इंडिज आणि इतर अनेक ठिकाणी जात असतात. यंदा मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह राज्यातून बाहेर जाणाऱया गणेशमूर्तींना नो एंट्री असणार आहे. त्यामुळे दरवर्षी परदेशातील मुंबईतील गणेशमूर्तीकारांकडे ऑर्डर देणाऱया अनेकांनी अद्याप त्यांच्या मूर्तींची ऑर्डर दिलेली नाही. मुळात सध्या परदेशात जाणारी विमानसेवा बंद आहे. त्यामुळे गणेशमूर्तींना हे तिकीट मिळणार नाही.

मुर्तिकार राजू शिंदे म्हणाले की, दरवर्षी आमच्याकडून वेस्ट इंडिज, लंडन याठिकाणी गणेशमूर्ती जाते. यंदा मात्र या मूर्ती जाणार नाहीत. त्यांच्याकडून मूर्तीसाठी कोणत्याही प्रकारची विचारणा झालेली नाही आणि इतक्या कमी वेळेत मूर्ती तयार करुन पाठविणे शक्य नसल्याचे मत त्यांनी दै. सामनाकडे व्यक्त केले.

n विमान सेवा बंद असल्याने बसणार फटका
n अद्याप कार्यशाळा सुरू झालेल्या नाहीत
n कोरोनाच्या पार्श्वभूमीवर क्वारंटाईन करण्याच्या प्रकियेसह अनेक नियमांची पूर्तता करणे शक्य नाही
n मुंबईतील मूर्तिकार दुहेरी संकटात

– शिपिंग हा दुसरा पर्याय उपलब्ध असला तरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासह इतर अनेक नियमांची पूर्तता करावी लागल्याने अनेकांनी यंदा मुंबई बाहेर परदेशात गणेशमूर्ती न नेण्याचा निर्णय घेतल्याची माहिती मूर्तिकार संतोष कांबळी यांनी दिली.