
कोरोनाला रोखण्यासाठी पालिका आणि राज्य सरकारच्या माध्यमातून मैदानांवर सुरू करण्यात आलेल्या ‘फिल्ड हॉस्पिटल’मधील अद्ययावत आरोग्यसुविधा देशासमोर आदर्श निर्माण करणार्या आहेत. या ठिकाणच्या अद्ययावत सुविधा संसर्ग रुग्णालय उभारून त्या ठिकाणी उपलब्ध केल्यास मुंबईकरांना कायमस्वरूपी सुविधा निर्माण होईल, असे प्रतिपादन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंबईत कोरोनाबाधितांसाठी निर्माण केलेल्या साडेतीन हजार बेडच्या लोकार्पणप्रसंगी ते बोलत होते.
कोरोनाला रोखण्यासाठी सिडकोच्या साहाय्याने मुलुंड येथे, मुंबई मेट्रोच्या साहाय्याने दहिसर येथे, तर ‘नमन’ संस्थेच्या माध्यमातून महालक्ष्मी रेसकोर्स आणि बीकेसी या ठिकाणी एकूण 3520 खाटा उपलब्ध झाल्या आहेत. या सुविधेच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. ‘फिल्ड हॉस्पिटल’ सुरू करणारे महाराष्ट्र देशात पहिले राज्य आहे. मोकळ्या जागेवरील आयसीयू सुविधा सुरू करून महाराष्ट्राने देशाला आदर्श घालून दिला आहे. या सेवा तात्पुरत्या असल्या तरी दर्जेदार आहेत. त्यांची उभारणीही एखाद्या कायमस्वरूपी रुग्णालयांइतकीच भक्कम आहे. आगामी काळात व्हायरसचा प्रादुर्भाव वाढल्यास त्याचा सामना करण्यासाठी आपल्याला ‘इन्फेक्शन हॉस्पिटल’ सुरू करून सज्ज रहावे लागेल असे ते म्हणाले. यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, महापौर किशोरी पेडणेकर, पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आदी उपस्थित होते.
कोरोना लढ्याची डॉक्युमेंटरी बनणार
कोरोना रोखण्यासाठी राज्य, पालिका, सामाजिक संस्थांसह नागरिकांचे योगदानही मोलाचे आहे. सर्वजण अविश्रांत मेहनत घेत आहे. आपण जिद्दीने जे काम करतोय त्याला जगात तोड नाही. ऑक्सिजन, आयसीयू, डायलिसिस, जगातली सर्वात मोठे प्लाझ्मा केंद्र अशी सर्व प्रकारची रुग्णसेवा अवाक करणारी आहे. त्यामुळे या कोरोनाविरोधातील लढ्याची डॉक्युमेंटरी बनवाकी असेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनाविरोधातील हे युद्ध आपण लवकरच जिंकणारच आहोत. मात्र हे युद्ध आपण कसे जिंकलो याची नोंद रहावी यासाठी ही डॉक्युमेंटरी ऐतिहासिक ठरेल असेही ते म्हणाले.
आपलं मॉडेल जगभरात जाणार!
राज्याच्या मंत्र्यांकडे वेगवेगळी खाती असली तरी सर्वजण आता कोरोना रोखण्यासाठी ‘कोविड रिस्पॉन्स’, मेडिकल इमर्जन्सी म्हणून काम करीत आहेत. देशातील पहिले राज्य जेथे 60 टक्के ऑक्सिजनची सुविधा असलेल्या खाटा, आयसीयू खाटा आहेत. या सोयी सुविधांमध्ये रोबोटेक तंत्रज्ञान आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. रुग्णांच्या उपचारासोबत डॉक्टर सुरक्षित राहतील याची काळजी घेतली जात आहे. महाराष्ट्र, पालिकेने सुरू केलेल्या जम्बो सुविधेचे दिल्लीच्या टीमने कौतुक केले याचा अभिमान वाटतो. आपण सुरू केलेल्या अद्ययावत सुविधांचे मॉडेल जगभरात जाणार असे गौरवोद्गार पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी काढले.





























































