
अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर चाहत्यांनी व्यक्त केलेला संताप योग्य असून बॉलिवूडने लोकांचा राग गांभीर्याने घ्यावा, अशा शब्दांत अभिनेता मनोज वाजपेयी यांनी समस्त कलाकारांना सुनावले आहे. तसेच लोकांच्या कौतुकाचे जसे धनी होता, तसेच त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपण बांधिल आहोत, असेही त्याने म्हटले आहे.
एका टीव्ही चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत मनोज म्हणाला, ‘सेलिब्रिटी जर लोकांनी केलेलं कौतुक ऐकत असतील तर त्यांनी टीकासुद्धा ऐकली पाहिजे. जर तुमच्याविरोधात असंतोष असेल तर त्याचं उत्तर तुम्हाला द्यावंच लागणार आहे. ही लोकं जर माझा चित्रपट हिट करत असतील आणि मी त्यांना योग्य म्हणत असेन तर जेव्हा हेच लोक मला प्रश्न विचारतील, तेव्हा त्या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठीही मी बांधिल आहे. सरकारसुद्धा याच नियमावर चालतं.
मनोज वाजपेयीने सुशांतसोबत ‘सोनचिडियाँ’ या चित्रपटात काम केलेलं आहे. याआधी दिलेल्या मुलाखतीत मनोजने सुशांतच्या कामाचं कौतुक केलं होतं. सर्वांच्या आयुष्यात चढउतार येतात. सुशांतच्या आयुष्यातही ते आले. मला नाही वाटत की मी त्याच्या इतका प्रतिभावान आणि हुशार आहे. मी वयाच्या 34 व्या वर्षांपर्यंत काहीच कमावलं नव्हतं. त्याच्या तुलनेत माझं यश काहीच नाही, असे मनोज म्हणाला होता.



























































