
मनमाड शहर आणि परिसरात गेल्या काही दिवसांत कोरोनाबाधितांची संख्या झपाटय़ाने वाढत आहे. ही साखळी तोडण्यासाठी मनमाड शहर व्यापारी महासंघातर्फे बुधवारपासून शहरात पाच दिवसांचा ‘जनता कर्फ्यू ’अर्थात लॉकडाऊनला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर बुधवार सकाळपासून शहरात ‘जनता कर्फ्यू’चा प्रभाव दिसून आला. काही अपवाद वगळता, बाजारपेठेत सर्वत्र दुकाने बंदच होती. व्यापारी महासंघाच्या या कर्फ्यूला विविध राजकीय पक्ष-संघटनांनी पाठिंबा दिला आहे.
बुधवार सकाळपासून शहराच्या मुख्य बाजारपेठेतील, तसेच विविध भागांतील व्यापारी, व्यावसायिक आणि दुकानदारांनी उत्स्फूर्तपणे जनता कर्फ्यूमध्ये सहभाग घेतला. राज्यमार्गावर आणि इतर भागांतही अशीच संमिश्र परिस्थिती पाहायला मिळाली. व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱयांनी शहराच्या विविध भागांतून फेरफटका मारून ‘जनता कर्फ्यू’मध्ये सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी सहभाग नोंदवावा, अशी विनंती केली आणि त्याला प्रतिसादही चांगला मिळाला. व्यापारी महासंघाने बुधवारपासून सलग पाच दिवस जनता कर्फ्यू लावण्याचा निर्णय स्वयंस्फूर्तीने घेतला. याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून पोलीस आणि पालिका प्रशासनालाही निवेदन दिले. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष राजाभाऊ पारिक यांच्या नेतृत्वाखाली महासंघाच्या सर्व पदाधिकाऱयांनी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते.

































































