‘टिकटॉक’बंदी!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अभिपर्णा भोसले

एखाद्या ऍपवर मिळणारी प्रसिद्धी म्हणजे लोकप्रियता नसते, हे सुज्ञ लोकांस माहिती असते. म्हणूनच टिकटॉकसारख्या सामाजिक माध्यमांवर असणारे फॉलोअर्स, येणारे लाइक्स, कमेंट्स, मिळणारे ह्यूज हे प्रत्यक्षात कवडीमोलाचे असतात. ज्यांना जाहिरातींसाठी किंवा ब्रँड एण्डॉर्समेंटसाठी पैसा मिळतो तोही उत्पन्नाचा शाश्वत प्राथमिक सोर्स नसतो. एक चूक मिळालेली सगळी प्रसिद्धी गमावण्यास कारणीभूत ठरते, अशा ऍप्सवर बंदी आल्याने प्रत्यक्ष आयुष्यात कर्तृत्व नसेल आणि हाताशी काम नसेल तर माणसे सैरभैर होतात. ‘टिकटॉक’सारख्या हिंदुस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय ऍपवरील बंदीचे असे आणि इतर काय परिणाम झाले आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे.

हिंदुस्थानी पर्यायी ऍप्स

हिंदुस्थानात टिकटॉक बॅन होण्याची ही पहिलीच वेळ नाही. सरकारी यंत्रणेसाठी टिकटॉक ही एक डोकेदुखी होऊन बसली होती. मागील वर्षी कोर्टाच्या आदेशानुसार टिकटॉक हिंदुस्थानी ऍप स्टोअरवरून हटवण्यात आले होते. कसलेही सेन्सॉरिंग होत नसल्याने टिकटॉक पॉर्नोग्राफी पसरवण्यास कारणीभूत ठरत असल्याचा आरोप करण्यात आला होता. पण हा बॅन अल्पावधीपुरताच मर्यादित राहिला. धार्मिक तेढ वाढवणे आणि त्यायोगे दहशत निर्माण करणे यासाठीही टिकटॉक बेमालूमपणे वापरले जात असल्याने राजकारण्यांचीही या ऍपला नापसंती होती. पण टिकटॉक वापरणारे आणि टिकटॉकवरील बंदीस पाठिंबा देणारे यांतील संख्यात्मक फरक मोठा आहे. या बॅनमुळे हिरावून घेतला गेलेला प्लॅटफॉर्म लोकांना परत मिळवून देण्यासाठी हिंदुस्थानी कंपन्यांना कंबर कसण्याची गरज आहे.

हिंदुस्थानच्या माहिती सुरक्षेस धोका असल्याचे कारण देऊन हिंदुस्थान सरकारने चिनी ऍप्सवर बंदी आणली. अशा प्रकारे जागतिक माध्यमांवर बंदी आणून माहितीच्या देवाणघेवाणीस आळा घालणे ही चीनची तर फार जुनी पॉलिसी आहे. सिलिकॉन व्हॅलीतील गुगल आणि फेसबुकसारख्या मोठय़ा कंपन्यांवर बंदी घालून बीजिंगने आपल्या देशांतील नागरिकांचा इंटरनेट वापर मर्यादित केला. संपूर्ण जगात वापरल्या जाणाऱया या कंपन्यांचा चीनमध्ये विस्तार होऊ दिला नाही. या माध्यमांना पर्याय म्हणून चिनी कंपन्यांच्या व्हेंचर्सना प्रोत्साहन दिले गेले. त्यातून माहिती सुरक्षितता आणि राष्ट्रांतर्गत कंपन्यांचा विस्तार हा फायदा असला तरी प्रत्यक्षात नागरिकांच्या संभाषणांवर करडी नजर ठेवण्यासाठी ही माध्यमे काम करत असल्याचे वारंवार समोर येते. हिंदुस्थानी बॅन हा अशा प्रकारच्या राजकीय नियंत्रणास भरीस घालणारा बॅन नसून मुख्यतः चिनी कंपन्यांच्या हिंदुस्थानातील विस्तारास आणि त्यातून मिळणाऱया आर्थिक नफ्यास खीळ घालण्यासाठी उचललेले पाऊल आहे.

हिंदुस्थान सरकारने बॅन केलेली 59 चिनी ऍप्स अगोदरच डाउनलोड केलेली असतील तर चालू राहतील, पण अपडेट करता येणार नाहीत. गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध नसली तरी इतर साईट्सवरून डाउनलोड करून घेता येत असल्याने खऱया अर्थाने बॅनचा कितपत फायदा होईल याबद्दल साशंकता आहे. यातील टिकटॉक हे हिंदुस्थानात सर्वांत जास्त वापरले जाणारे ऍप आहे. त्यावर प्रोफेशनल व्हिडीओ मेकर्सपासून शेतकऱयांपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील व्यक्ती ऑक्टिव्ह होत्या. काहीजण भाषा शिकवण्यासाठी तर काही नातेसंबंधांवर सल्ले देण्यासाठी, काही ब्रँडच्या जाहिरातींसाठी, तर काही आपल्या गाण्याच्या आणि इतर कलाकृतींच्या प्रमोशनसाठी टिकटॉकचा वापर करत होते. केवळ वीस सेकंदांचे व्हिडीओज् शूट करणाऱया या ऍपचे फीचर्स आकर्षक असल्याने ते अल्पावधीत लोकप्रिय झाले.

नाण्याच्या दोन बाजू

टिकटॉकवर लक्षावधी फॉलोअर्स असलेल्यांसाठी शंभरेक व्हिडिओज् शूट करणे, त्यासाठी स्क्रिप्ट लिहिणे आणि त्यांतील मोजके दहा-पंधरा व्हिडिओज् अपलोड करणे नित्याचे झाले होते. जो फरक ई-मेल आणि व्हॉट्सऍपच्या वापरामध्ये आहे तोच फरक यू टय़ूब आणि टिकटॉकच्या वापरामध्ये आहे. ई-मेल करणे किचकट वाटू शकते. व्हॉट्सऍपवर दोन ओळी टाइप करून हवी ती बाब स्पष्टपणे सांगता येते. तसेच फोटोज् आणि व्हिडीओज् थेट पाठवता येतात. सगळीच संभाषणे फॉर्मल या गटात मोडत नाहीत. त्यामुळे व्हॉट्सऍपला ई-मेलपेक्षा जास्त प्रसिद्धी मिळाली. तसेच यू टय़ूबवर अकाउंट काढणे, इंग्रजीमध्ये हवा तो व्हिडीओ शोधणे आणि तो स्ट्रीम करून पाहणे हे इंग्रजी साक्षर नसलेल्यांना किचकट वाटू शकते. त्यापेक्षा टिकटॉक सुरू केले असता आपण ज्यांना फॉलो करतो त्यांचे व्हिडिओज् लगेच दिसतात. त्यामुळे व्हॉट्सऍपप्रमाणेच टिकटॉकही ग्रामीण भागात वेगाने पसरले. सामान्य लोकांसाठी टिकटॉक मनोरंजनाचे साधन झाले होते. स्त्रिया मुक्तपणे व्यक्त होऊ शकत होत्या. प्रस्थापित टॅलेंटऐवजी रॉ टॅलेंटला संधी मिळत होती आणि ते लोकांना आवडतही होते. प्रोफेशनल युजर्ससाठी टिकटॉकवर पूर्णवेळ व्हिडिओज् अपलोड करणे रोजच्या जीवनाचा भाग बनून गेले होते. जे फॉलोअर्स उपयुक्त माहिती देणाऱया अकाउंट्सना फॉलो करून त्यांच्याकडून वेट लॉस, एक्सरसाइजसंबंधी टिप्स घेण्यासाठी नियमित व्हिजिट करत होते त्यांच्यासाठी टिकटॉक पुश फॅक्टर म्हणून लाभलेले वरदान होते. ही या ऍपच्या सदुपयोगाची बाजू झाली.

दुसरी बाजू आहे दुरुपयोगाची. हिंदुस्थानची टीनएजपासून तिशीच्या उंबरठय़ावर असलेली तरुण पिढी टिकटॉकचा वापर करण्यात आघाडीवर होती. महत्त्वाकांक्षा आणि स्वप्ने असलेल्या किशोरवयीन मुलांना सेलिब्रिटींची लाइफस्टाइल कॉपी करणे आणि नवीन ट्रेंडवर व्हिडिओज् बनवण्याचे व्यसन लागले होते. कवडीही न कमावणारे केवळ टिकटॉकवर प्रसिद्ध होण्यासाठी घरच्यांकडून पैसे घेऊन ट्रेंडी कपडे परिधान करून आणि स्टायलिश केशरचनेवर खर्च करून आपला वेळ आणि क्षमता शिक्षणावर केंद्रित करण्याऐवजी एका ऍपवर वाया घालवू लागले. त्यांनी बनवलेले व्हिडिओज् व्हायरल होत असले तरी प्रत्यक्षात प्रॉडक्टिव्ह असे काहीच घडत नव्हते. काही व्हिडीओज्मधून तर हेट स्पीच, हिंसा आणि समाजविघातक गोष्टींचे उदात्तीकरणही केले गेले. आवाक्याबाहेरील स्व-अपेक्षा, पूर्ण न होऊ शकणाऱया महत्त्वाकांक्षा, एकंदरीत समाज आणि व्यवस्थेविरुद्धच्या फ्रस्ट्रेशनमधून अशा वृत्ती फोफावणे स्वाभाविक होते. हिंदुस्थानी डिजिटल प्लॅटफॉर्म्सनी टिकटॉकवरील बंदीचे स्वागत केले. एका अर्थी त्यांची बाईटडान्स या चायनीज कंपनीशी असलेली स्पर्धा संपुष्टात आल्याचे चित्र सध्या तरी दिसते आहे. इनमॉबी या बेंगळुरूस्थित डिजिटल व्हेंचरने रोपोसो नावाचे ऍप लाँच केलेले आहे. हिंदुस्थान आणि चीनमधील तणाव निवळण्याची चिन्हे नसल्याने टिकटॉकवरील बॅन हटवला जाण्याची शक्यता नजीकच्या भविष्यात दुरापास्त आहे. पूर्वीचे टिकटॉक युजर्स आता रोपोसोकडे वळले असून बॅननंतर रोपोसो इन्स्टॉल करणाऱयांच्या संख्येत लक्षणीय भर पडल्याचे इनमॉबीचे सर्वेसर्वा नवीन तिवारी यांनी सांगितले. हिंदुस्थानी ऍप्सना टिकटॉकसारखा आकर्षक युजर इंटरफेस तयार करणे जमेल की नाही हा कळीचा मुद्दा आहे. पण अशा प्लॅटफॉर्म्सचे व्यसन लागलेल्या लोकांना अधिक काळासाठी निक्रिय राहणे जमणार नाही आणि ते नाइलाजाने का होईना, पण या ऍप्सचा आधार घेतील. टिकटॉकवरील बॅन अजून लांबवला गेल्यास अशा डिजिटल व्हेंचर्समध्ये वाढ होत राहील आणि त्यांचा विस्तारही होऊ शकेल. हे हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेसाठी फायद्याचे ठरेल.

युजर्सचे भवितव्य

साधारणतः 20 कोटी हिंदुस्थानी लोकसंख्या टिकटॉकवर ऑक्टिव्ह होती. एवढय़ा मोठय़ा देशात लाइमलाइटमध्ये येणे किंवा रूढार्थाने यशस्वी असणे प्रत्येकालाच शक्य नसते. मग तुमच्या हालचालींसकट तुम्ही दिसू शकाल आणि ऍपपुरते का होईना, पण तुम्हाला कलाकार म्हणून ओळख देईल असा प्लॅटफॉर्म एका क्लिकवर उपलब्ध असल्याने टिकटॉक लोकांच्या पसंतीस उतरले. टिकटॉकवरील युजर्ससाठी डिस्कव्हर फीचरचा वापर करून जगभरातील युजर्सशी जोडले जाणे आणि त्यांच्या सादरीकरणाशी साधर्म्य आढळणे हा एक मोठा पुश फॅक्टर होता; पण इंग्रजीत प्रसिद्धी आणि लोकप्रियता या दोन संकल्पनांमध्ये जो फरक आहे तो टिकटॉकमुळे अजून स्पष्ट झाला.

एखाद्या ऍपवर मिळणारी प्रसिद्धी म्हणजे लोकप्रियता नसते, हे सुज्ञ लोकांस माहिती असते. म्हणूनच टिकटॉकसारख्या सामाजिक माध्यमांवर असणारे फॉलोअर्स, येणारे लाइक्स, कमेंट्स, मिळणारे ह्यूज हे प्रत्यक्षात कवडीमोलाचे असतात. ज्यांना जाहिरातींसाठी किंवा ब्रँड एण्डॉर्समेंटसाठी पैसा मिळतो तोही उत्पन्नाचा शाश्वत प्राथमिक सोर्स नसतो. एक चूक मिळालेली सगळी प्रसिद्धी गमावण्यास कारणीभूत ठरते, अशा ऍप्सवर बंदी आल्याने प्रत्यक्ष आयुष्यात कर्तृत्व नसेल आणि हाताशी काम नसेल तर माणसे सैरभैर होतात. ‘टिक टॉक’सारख्या हिंदुस्थानातील सर्वाधिक लोकप्रिय ऍपवरील बंदीचे असे आणि इतर काय परिणाम झाले आहेत का, हा संशोधनाचा विषय आहे.