जागतिक आरोग्य संघटनेचे भवितव्य

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> डॉ.शैलेंद्र देवळाणकर

अमेरिकेने अखेर जागतिक आरोग्य संघटनेला अर्थात डब्ल्यूएचओला सोडचिठ्ठी दिली. गेल्या काही महिन्यांपासून अमेरिका आणि डब्ल्यूएचओमधला संघर्ष वाढला होता. अमेरिकेने जागतिक आरोग्य संघटनेला दिला जाणारा 500 दशलक्षचा निधी यापूर्वीच रोखला होता. एप्रिल महिन्यात काही अटी एका महिन्यात पूर्ण करण्यास अमेरिकेने या संघटनेला सांगितले होते. त्याची पूर्तता झाली नाही. शेवटी अमेरिकेने या संघटनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. यातून बहुराष्ट्रीय संघटना महासत्तांच्या राजकारणाचे व्यासपीठ कसे बनत आहेत याचे दर्शन होते. अमेरिकेने एवढा टोकाचा निर्णय का घेतला, जागतिक आरोग्य संघटनेचे नेमके काय चुकले हे जाणून घेतानाच याचे परिणाम काय होतील याचाही विचार करणे आवश्यक आहे.

  • अमेरिकेने डब्ल्यूएचओमधून बाहेर पडण्याच्या निर्णयाकडे चुकीचा किंवा केवळ राजकारणाचा भाग म्हणून पाहता येणार नाही. त्यासाठी गेल्या काही महिन्यांतल्या जागतिक आरोग्य संघटनेच्या काही चुका प्रामुख्याने जबाबदार आहेत. नोव्हेंबरमध्ये चीनच्या वुहान प्रांतात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडला होता; पण जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाला जागतिक महामारी घोषित करण्यासाठी 11 मार्च उजाडले. म्हणजे तीन – साडेतीन महिन्यांनंतर डब्ल्यूएचओने महामारी जाहीर केली. वुहानमध्ये 17 नोव्हेंबर रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण लक्षात आल्यानंतर 20 डिसेंबरपर्यंत चीनने काही कृती केली नाही. त्यावेळी चीनने हा संसर्गजन्य विषाणू नसल्याचे सांगितले. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेने चीनची बाजू उचलून धरणे अत्यंत चुकीचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेलाच या विषाणूचे गांभीर्य कळले नाही आणि हा विषाणू व्यक्ती-व्यक्तींमधून संक्रमित होत नसल्याचे या संघटनेने सुरुवातीला जाहीर केले. परिणामी, या संघटनेने जगाची दिशाभूल करत चीनची पाठराखण केली.

अमेरिकेचे जागतिक आरोग्य संघटनेमधून बाहेर पडणे हे या संघटनेच्या वाढत्या राजकीयीकरणाचे लक्षण आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात बहुराष्ट्रीय संस्था, मग ती जागतिक आरोग्य संघटना असो, मानवाधिकार समिती यांसारख्या संघटना असोत, त्या खरे तर स्वतंत्र असल्या पाहिजेत. मात्र गेल्या काही वर्षांत या संघटना आंतरराष्ट्रीय राजकारणाचा भाग झाल्याचे दिसून येते आहे. विकसित महासत्तांच्या सत्ता समीकरणाच्या राजकारणाचं व्यासपीठ होताना दिसताहेत. जसे संयुक्त राष्ट्र संघटना त्याच्या स्थापनेपासून अमेरिका आणि सोव्हिएत रशिया यांच्यातील आणि आता अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्ता समतोलाच्या राजकारणाचे व्यासपीठ बनली आहे. तीच अवस्था आज जागतिक आरोग्य संघटनेची झालेली आहे. अमेरिका आणि चीन यांच्यातील सत्ता समतोलाच्या राजकारणाचा ती एक भाग होत असल्याचे दिसून येत आहे. या जागतिक स्तरावरील संघटनांचा मुख्य प्रश्न आहे तो म्हणजे फंडिंग. त्यांना आवश्यक असलेला निधी मिळत नाही. विकसित किंवा श्रीमंत देश त्यांना निधी पुरवत असतात आणि मग या देशांची बाजू उचलून धरण्याचे काम या संघटना करतात, जे अर्थातच दुर्दैवी आहे. कधीकाळी अमेरिका जागतिक आरोग्य संघटनेला सर्वात जास्त निधी देत होती, परंतु आता ती जागा चीनने घेतली आहे. त्यामुळे डब्ल्यूएचओ सध्या चीनची बाजू घेताना दिसत आहे.

वस्तुतः अशा जागतिक संघटना, ज्यांनी तटस्थ राहिले पाहिजे, ज्यांना विकसनशील देशांमध्ये आरोग्याचे महत्त्वाचे काम करायचे आहे, त्याच जर सत्ता समतोलाचा भाग होत असतील किंवा त्या राजकारणातील हत्यार म्हणून वापरल्या जात असतील तर जागतिक पातळीवर त्याच्याइतकी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही.

आज कोरोना विषाणूने जगभरात हाहाकार माजवला आहे. जगभरात या महामारीच्या संसर्गाने अनेक बळी जाताहेत. त्याला जबाबदार कोण आहे? जगातल्या 10 जीवघेण्या विषाणूंचा जन्म हा परदेशातच झालेला आहे. असे असूनही त्याचे परिणाम मात्र हिंदुस्थानला भोगावे लागले आहेत. सार्स, स्वाईन फ्लू, बर्ड फ्लूनंतर आलेला हा कोरोना विषाणू चीनच्या वुहान प्रांतात झाला हे आता लपून राहिलेले नाही. कदाचित चीनलाही हा विषाणू एवढय़ा लोकांचे बळी घेईल असे वाटले नव्हते. डॉ. ली यांच्यासारख्या चिनी डॉक्टरांनी याची कल्पना देऊ केली तेव्हाही चीनने त्यांची मुस्कटदाबीच केली होती. दरम्यानच्या काळात पर्यटनप्रेमी असलेले चिनी नागरिक आणि व्यापारी अजाणतेपणी सर्व जगभरात फिरत या रोगाचा प्रसार करत होते.
असे असताना जागतिक आरोग्य संघटनेलाच या विषाणूचे गांभीर्य कळले नाही आणि हा विषाणू व्यक्ती-व्यक्तींमधून संक्रमित होत नसल्याचे जाहीर केले. बिनबुडाचे हे वक्तव्य करून त्यांनी जगाला गाफील ठेवले. जगभरात जागतिक आरोग्य संघटनेचे निकष पाळले जातात. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेने जगाची दिशाभूल करत चीनची पाठराखण केली. चीनमध्ये प्रवास करण्यात धोकाही नसल्याचे सांगितले, परंतु दुसरीकडे अमेरिकेने चीनला जाण्यास बंदी घातली होती. पाश्चात्त्य देशांच्या निष्काळजीपणामुळे हा विषाणू पसरला असेही विधान डब्लूएचओने मार्चमध्ये केले होते. यामुळे ही संघटना चीनच्या बाजूने आहे का? किंवा चीनची आश्रित आहे का? असेही प्रश्न पडतात.

डब्लूएचओच्या अशा वर्तणुकीमागे एक कारण असू शकते ते म्हणजे अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प सत्तेत आल्यानंतर त्यांनी सर्वच जागतिक संघटनांतून माघार घेण्याचा सपाटाच लावला होता. त्यामुळे या संघटनांना अर्थपुरवठा करावा लागणार नाही आणि तो पैसा वाचवून अमेरिकेची अर्थव्यवस्था टिकवून ठेवता येईल. तसे ट्रम्प यांनी बोलूनही दाखवले. हेच चीनच्या पथ्यावर पडले. जिथे जिथे अमेरिकेने अंग काढून घेतले, तिथे तिथे चीनने शिरकाव केला. जागतिक आरोग्य संघटनेला सर्वाधिक अर्थपुरवठा अमेरिका करत होती, परंतु चीनने शिरकाव केला आणि टायग्रोस या डब्लूएचओच्या अध्यक्षांना निवडून देण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली. चीनच्या या उपकारांची जाण ठेवत कोरोना विषाणूच्या बाबतीत चीनची पाठराखण करत जगाला कोरोना संसर्गाच्या विळख्यात लोटले. जानेवारी महिन्यातच जगाला सावधगिरीची सूचना देण्याऐवजी जागतिक आरोग्य संघटनेने बोटचेपी भूमिका न घेता जागतिक आरोग्य रक्षणाचे त्यांचे ध्येय कायम ठेवले असते तर आज जग ठप्प झाले नसते, लोकांना घरबंदी व्हावे लागले नसते, आंतरराष्ट्रीय स्तरावर जगबंदी होण्याची वेळ आली नसती हे नक्की.

संयुक्त राष्ट्र संघटनेत 193 देश आहेत, परंतु हे देश जागतिक आरोग्य संघटनेला म्हणावे तेवढा निधी देण्याचा प्रयत्न करत नाहीत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करण्यासाठी जोपर्यंत सर्वच देश या संघटनांना पुरेसा निधी उपलब्ध करून आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्याचा प्रयत्न करत नाहीत तोपर्यंत या संघटना विशिष्ट देशांची तळी राखणार, जे देश त्यांना निधी पुरवतात. 2003 मध्ये जेव्हा सार्सची साथ आली होती, त्यावेळी अमेरिका मोठय़ा प्रमाणावर निधी देत होता. तेव्हा जागतिक आरोग्य संघटना अमेरिकेच्या निर्देशांनुसार काम करत होती. तेव्हा डब्लूएचओने चीनविरोधात कडक भूमिका घेतली होती, परंतु आता चीनने निधी देण्याबाबत महत्त्वाची जागा घेतली आहे. स्वाभाविकच डब्ल्यूएचओने चीनची बाजू उचलून धरली आहे, पण याच संघटनेला नव्हे, तर इतरही अनेक आंतरराष्ट्रीय संघटनांना चीन मोठा निधी देत आहे.

वास्तविक या सर्व संघटनांना आंतरराष्ट्रीय राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. विशेषतः जागतिक आरोग्य संघटनेची फार मोठी जबाबदारी आहे. कारण विकसनशील देशांमध्ये अत्यंत महत्त्वाचे काम करायचे आहे. अनेक साथीचे रोग आहेत, ज्यामुळे विकसनशील देशांमध्ये हजारो लोक प्रतिवर्षी मृत्युमुखी पडतात. यावरील आवश्यक औषधे उपलब्ध करून देणे, त्यासाठी आवश्यक त्या लसींचा विकास करणे हे जागतिक आरोग्य संघटनेचे काम आहे. अशा वेळी ही संस्थाच आंतरराष्ट्रीय राजकारणाचे केंद्र होते आणि आपल्या उद्दिष्टांपासून भरकटलेली दिसते असा आरोप या घडीला डब्ल्यूएचओवर होताना दिसतो आहे. औषध निर्माण कंपन्यांच्या औषधांचे मार्केटिंग किंवा विपणन कशा प्रकारे करता येईल अशा पद्धतीने डब्ल्यूएचओ काम करते असाही आरोप संघटनेवर होताना दिसतो. यातून ज्या उद्देशाने डब्ल्यूएचओची स्थापना करण्यात आली होती, त्या उद्दिष्टाला बगल देण्याचा प्रयत्न होतो आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने या सर्वांपासून दूर राहणे आवश्यक आहे. उलट विकसनशील देशांमध्ये जे गरीब देश आहेत त्यांच्यामध्ये प्रामुख्याने असे साथीचे रोग येतात. त्यामुळे आर्थिक आणि सामाजिक असे नुकसान होते. त्यावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायामधल्या सर्व राष्ट्रांनी जर गरज पडली तर त्यांना मदत करणे गरजेचे आहे. जेणेकरून जागतिक आरोग्य संघटनेचा वापर कोणताही देश आंतरराष्ट्रीय राजकारणात स्वतःचा वरचष्मा दाखवण्यासाठी करणार नाही.