निसर्गभान – वन्य जीवांना ‘अनलॉक’ करणारे लॉकडाऊन!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> प्रफुल्ल भांबुरकर

सखोरी हा शब्द आपल्या हिंदुस्थानींसाठी नवीन नाही. नुकतीच लेहमध्ये चीनने केलेली लुडबुड सर्वांच्या स्मरणात आहेच. तिचा समाचार नकीच घेतला जाईल. मात्र जंगलाचे नियम काटेकोरपणे पाळणाऱया प्राण्यांच्या बाबतीत असे घडते तेव्हा असे का, असा प्रश्न निर्माण होणे सहाजिकच आहे. विशेषतः कोरोनाच्या प्रभावामुळे मनुष्य हालचाली स्थिरावल्या. एका चौकटीत बंदिस्त झाल्या अन् वन्यप्राण्यांच्या हालचालींचे क्षेत्र विस्तारले. कधी नव्हे ते गेंडा, हत्तींसारख्या विशालकाय प्राणी, मगरींपासून तर मोरासारखे पक्षी खेडी, गाव इतकेच काय मुंबईसारख्या शहरातही फेरफटका मारताना भीती आणि आंनद दोन्हींची अनुभूती देत होते.

हे का आणि कसे हे प्रश्न सर्वांच्या मनात न आले तर नवलच! ही प्राण्यांची वागणूक निसर्गाच्या विरुद्ध होती का… तर मुळीच नाही. प्रत्यक्षात मानवाने निसर्गाच्या पटावर इतर प्राण्यांना नामोहरम केल्याच्या अहंवृत्तीला हा धक्का होता. प्रथमच मनुष्य स्वनिर्मित जंतूच्या प्रादुर्भावाने घरात बंदिस्त झाला होता. निसर्गाला बहरताना, पक्ष्यांच्या मधुर संगीताचा आस्वाद घेत शुद्ध हवा अनुभवत होता. यातच मनुष्याच्या कोलाहलाने इतके दिवस गांगरून गेलेले वन्य प्राणी स्वच्छंदपणे या भ्रमंतीच्या संधीचा लाभ घेत होते. कदाचित हा दोन पायांचा उपद्रवी प्राणी अचानक जंगलात येण्याचं का बरे थांबला असेल याचेच कारण तपासण्यासाठी ते इथे आले असावेत. त्यांच्या रुजलेल्या वाटा शेती, गावं आणि शहरांनी अडवल्या गेल्याचं त्यांना लक्षात आले असेल. संपूर्ण हिंदुस्थानात कमी-अधिक प्रमाणात हेच दृश्य आढळले. आश्चर्य म्हणजे, प्राण्यांनी मानवी वस्तीत येऊनही हल्ले करण्याच्या विशेष नोंदी नाहीत. याचाच अर्थ ते मानवाचा प्राणी म्हणून योग्य सन्मान आणि आदर करतात. निदान आमचे येण्या-जाण्याचे मार्ग तरी बंद करू नका एवढीच त्यांची अपेक्षा असेल.

कोविडचा सकारात्मक परिणाम पर्यावरण आणि इतर प्राण्यांच्या जीवनावर झाला. या शतकातील विस्मयकारक घटनांची नांदी अनुभवास आली. या प्रचंड जनसंख्येचे आणि मानवी विकास प्रणालीच्या अनुषंगाने जीवसृष्टी अक्षरशः होरपळून जात असताना मात्र पर्यावरण आणि प्राणीसृष्टीला दिलासा देणाऱया घटना मात्र आशा पल्लवित करणाऱया ठरल्या. मानवाने संपूर्ण सृष्टीचे पुढारीपण घेऊन सर्व जीवसृष्टीला आदर आणि जगण्याचा अधिकार बहाल करावेत हेच कोरोनासारख्या सूक्ष्म जंतूने कदाचित बजावले असावे.

पर्यावरण संरक्षणासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर करोडो, अब्जो रुपयांचा निधी उपलब्ध होऊनही मानवाला जे साधले नाही ते केवळ या काही महिन्यांच्या टाळेबंदीच्या दरम्यान घडले. करोडो लोकांच्या बंदिवासाचा ऊर्जात्मक परिणाम निसर्ग आणि वन्य जीव अधिवासावर घडून आला. महासागर, समुद्र, नद्या, सरोवर, पर्वत, यासोबतच वने, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्य प्रदूषणमुक्त होऊन फुलू लागली.

कोल्हापुरात गवा, डेहराडूनमध्ये हत्ती, सवाई माधोपुरात वाघ, चंद्रपूरला अस्वल तसेच अनेक भागांत सांबर, चितळ, मोर तर समुद्रकिनाऱयावर विशालकाय व्हेल, डॉल्फिन पण भ्रमंती करताना दिसत होते. असे असताना त्यांच्या असहाय्यतेचा फायदा स्थानिकांनी न घेतला तर नवलच! कोरोनाची बंदी झुगारून मोठय़ा संख्येने प्राण्यांची शिकार करण्यात आली. यातून वाघ, बिबटे पण सुटले नाहीत हेही विसरून चालणार नाही.

असे असताना प्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव झाला ही एक बाजू झाली; पण या 100 वर्षे किंवा स्वातंत्र्योत्तर काळाचा विचार केला तर हजारो चौरस किलोमीटर जमिनीवरील वनांचा नाश शेती आणि इतर राष्ट्र विकासाकरिता झालेला असून आजही होतोच आहे. हत्तीसारखे धार्मिक, आदरणीय व महत्त्वाचे प्राणी इतस्ततः भटकत आहेत. सुरक्षिततेच्या अभावाने मृत्युमुखी पडत आहेत. त्यांचे हे हाल तर लहान प्राण्यांचे काय होत असेल? आपण सर्व जीवसृष्टीचा आदर करण्यासाठी तरी त्यांच्या जागेत अतिक्रमण करणे थांबवावे हे या कोरोनाच्या निमित्ताने निसर्गाने मनुष्याला सुचविले आहे किंवा गर्भित सूचना दिली आहे हाच संदेश यातून मिळतोय.

कोरोनाच्या भीतीने सक्तीने लॉक डाऊन झालेल्या माणसांमुळे वन्य जीव सुखावले आहेत. त्यांचा मानवी वस्तीतला वावर पुढचा काही काळ असणारच आहे. म्हणूनच लॉकडाऊन शिथिल झाल्यावरही मानवी वस्तीत आलेल्या या वन्य प्राण्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी आपण निभावली पाहिजे.