
सिंधुदुर्ग जिह्यातील सर्व तालुक्यांमध्ये काल रात्रीपासून पडणाऱया मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सर्व सखल मार्ग पाण्याखाली गेल्याने बऱयाच गावांशी संपर्क तुटला आहे. बांदा शहरात काल रात्रीपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने तेरेखोल नदीला पाणी आल्याने आळवाडी बाजारपेठेत आज सकाळी पुराचे पाणी घुसले. नदीच्या पाण्याची पातळी वाढत असल्याने या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायत, महसूल, पोलीस प्रशासनाने आळवाडी येथे व्यापाऱयांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या आहेत.
बांदा दशक्रोशीला शनिवार रात्रीपासूनच मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तेरेखोल नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाणी आळवाडी बाजारपेठेत घुसले. पाण्याची पातळी वाढत असल्याने गावकऱयांना सतर्क राहण्याबाबत सूचना देण्यात आल्या. आळवाडी येथे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. सावंतवाडी शिरोडा राज्य मार्गावरील मळगाव घाटीत रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे दरडीचा काही भाग रस्त्यावर आला आहे. यामुळे वाहतूक एकमार्गी सुरू ठेवण्यात आली आहे. या मार्गावरून जाणारी आरोंदा-शिरोडा-सातार्डाकडे जाणारी वाहतूकसुद्धा काही काळ ठप्प झाली होती. आरोस मार्गे जाणाऱया पुलावर पाणी आले होते तर मळेवाडकडे जाणाऱया न्हावेली रस्त्यावर पाणी आल्यामुळे दोन्हीकडे वाहने खोळंबून राहिली.
सावंतवाडी तालुक्यात रात्रीपासून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले आहे. तळवडे येथील बाजारपेठ पुन्हा पाण्याखाली गेली आहे. तर जुन्या मुंबई-गोवा महामार्गावर इन्सुली येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. तर माजगावमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे काही घरात पाणी शिरण्याबरोबर झाडे उन्मळून पडल्याचा प्रकार घडला आहे.
कुडाळ तालुक्यात कोसळलेल्या पावसाने रविवारी तालुक्यात ठिकठिकाणी पाणी साचले होते. भंगसाळ (कर्ली), केताळबांबर्डे हातेरी व हुमरमळा पिठढवळ या नद्यांना पूर येऊन नदीकाठच्या परिसरात पुराचे पाणी घुसले. भंगसाळ (कर्ली) नदीला पुर येऊन नदीने धोक्याची पातळी ओलांडली. माणगांव खोऱयातील आंबेरी पुलावरील वाहतूक ठप्प झाली. त्यामुळे सुमारे 25 गावांचा माणगांवशी संपर्क तुटला आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर, पाकशी, वेताळबांबर्डे, पणदूर या भागातील सुमारे 25 ते 30 घरांना पुराच्या पाण्याने वेढा घातला. हुमरमळा, पणदूर, अणाव, पाकशी, वेताळबांबर्डे, कुडाळ, आंबडपाल, मुळदे, कविलकाटे, बांव, बांबुळी या भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याने शेतमळ्यांचे नुकसान झाले. तर तालुक्यातील वीज, दूरध्वनी सेवा काही काळ विस्कळीत झाली.
दोडामार्ग तालुक्यात तळवडे येथील बाजारपेठ पुन्हा पाण्याखाली गेली आहे. तर जुन्या मुंबई-गोव महामार्गावर इन्सुली येथे रस्त्यावर पाणी आल्यामुळे महामार्ग बंद झाला आहे. माजगावमध्ये अनधिकृत बांधकाम करण्यात आल्यामुळे काही घरात पाणी शिरण्याबरोबर झाडे उन्मळून पडल्याचा प्रकार घडला आहे.
वेंगुर्ल्यात मुसळधार
तालुक्यातील बहुतांश पूल, कॉजवे पाण्याखाली गेले आहेत. काही ठिकाणी नदी, ओहोळ यांचे पाणी पात्र ओलांडून शेतात, घरांमध्ये घुसले आहे. वेंगुर्ला शहरातील नवीन म्हाडाच्या इमारतीनजीक गटार तुंबून मुख्य रस्त्यावर पाणी आले आहे. तर सावंतवाडी वेंगुर्ला तुळस मार्गे मुख्य रस्त्यावरील होडाकडा तळवडेला जोडणारे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक मातोंड मार्गे वेंगुर्ला वळवली आहे. तालुक्यामध्ये शनिवारी सकाळी 8 ते रविवारी सकाळी 8 या दरम्यान 141 मिमी पावसाची नोंद झाली आहे.




























































