नवी मुंबईचे कचरा वर्गीकरण ठरले देशातील महापालिकांसाठी ‘रोल मॉडेल’

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नवी मुंबई शहराचे कचरा वर्गीकरण हे देशातील महापालिकांसाठी रोल मॉडेल ठरले आहे. केंद्र सरकारच्या ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’चा शुभारंभ करण्यासाठी दिल्लीमध्ये आयोजित केलेल्या एका विशेष समारंभात कचरा वर्गीकरण यंत्रणेचे सादरीकरण करण्याचा मान नवी मुंबई शहराला देण्यात आला. संपूर्ण देशातून हा मान फक्त नवी मुंबई महापालिकेला मिळाल्यामुळे आधुनिक शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

केंद्रीय शहरी विकास मंत्रालयाच्या वतीने दिल्ली येथील निर्माण भवनमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात ‘स्वच्छ सर्वेक्षण 2021’ या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शहरातील कचऱयाचे वर्गीकरण कसे करायचे याचे धडे अन्य महापालिकांना नवी मुंबईतील कचरा वर्गीकरण यंत्रणेच्या माध्यमातून देण्यात आले. महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी नवी मुंबई महापालिकेच्या मुख्यालयातून हे सादरीकरण ऑनलाइन केले. सदर प्रसंगी केंद्रीय शहरी विकासमंत्री हरदीपसिंह पुरी, सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्वच्छ भारत मिशनचे संचालक व्ही.के. जिंदाल आदी उपस्थित होते. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2019’ या अभियानामध्ये नवी मुंबई महापालिकेचा स्वच्छतेमध्ये देशात सातवा तर राज्यात पहिला क्रमांक आला होता. ‘स्वच्छ सर्वेक्षण 2020’चा निकाल अद्यापपर्यंत लागलेला नाही. मात्र तीन महिन्यांच्या झालेल्या सर्वेक्षणांमध्ये नवी मुंबई शहराला पंचतारांकित मानांकन मिळाले आहे.