पुणे : मुलीचं ड्रायव्हरवर प्रेम जडलं, बांधकाम व्यावसायिकाने प्रियकराला संपवलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

पुण्यातील एक तरूण आणि तरूणी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले होते. पेशाने ड्रायव्हर असलेल्या या तरुणासोबतचे मुलीचे प्रेमसंबंध तिच्या वडिलांना पसंत नव्हते. यामुळे त्यांनी या तरुणाचा काटा काढला. अमित सरोदे (वय-21)असं हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.

तरुणीचे आणि अमित सरोदेचे प्रेमसंबंध 4 वर्षांपासून होते. याची खबर तरुणीच्या वडिलांना काही दिवसांपूर्वी लागली होती. यामुळे तरूणीचे वडील यशवंत कांबळे हे संतापलेले होते. त्यांनी या दोघांना वेगळं होण्यासाठी अनेकदा सुनावलं होतं. मात्र तरीही हे दोघेजण गुपचूप एकमेकांना भेट होते. याबाबतही जेव्हा कांबळे यांना कळालं तेव्हा त्यांनी हे प्रकरण मुळापासून संपवायचं असं ठरवलं आणि अमितचा काटा काढण्यासाठी कट रचला.

रविवारी रात्री कांबळे यांनी दोन जणांना अमित सरोदेच्या मागावर पाठवलं, या दोघांनाही पिस्तुलं देण्यात आली होती. या दोघांनी अमितवर गोळ्या झाडल्या आणि नंतर चाकूने भोसकून खून केला. अमितचा खून केल्यानंतर हे दोघेही पळून गेले. या प्रकारानंतर अमितसोबत असलेल्या त्याच्या मित्राने पुण्यातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी कांबळे आणि त्याच्या दोन साथीदारांना अटक केली आहे.

12 जुलै रोजी पर्वती पायथ्याजवळ असलेल्या एका दुकानासमोर अमितची हत्या करण्यात आली. त्याच्या हत्येप्रकरणी कांबळेचे सहकारी असलेल्या आयुष काळे(24 वर्ष) आणि आदर्श ननावरे(24 वर्षे) यांना पोलिसांनी अटक केली.पुण्यामध्ये 10 दिवसांचा विशेष लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. यामुळे अमितची हत्या केल्यानंतर हल्लेखोरांना पळून जाणं अवघड झालं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अमित सरोदे आणि त्याची प्रेयसी हे दोघे लहानपणापासूनचे मित्र होते. त्याच्यासोबत आपल्या मुलीची असलेली मैत्री कांबळे यांना पसंत नव्हती. ज्या रात्री अमितचा खून झाला त्या रात्रीही कांबळे यांनी अमित सरोदे याला धमकावलं होतं असं पोलिसांनी सांगितलं आहे. याबाबतचे वृत्त पुणे मिररमध्ये प्रसिद्ध झाले आहे.