नाशिक : चुकीच्या तणनाशक औषधांचा वापर, दोन एकरांतील ऊस जळाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

तालुक्यातील आडगाव चोथवा येथील ऊस उत्पादक शेतकऱ्याला दुकानदाराने तणनाशक फवारणीसाठी चुकीचे औषधे दिल्याने फवारणी केल्यानंतर दोन एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. आर्थिक नुकसानभरपाई न दिल्यास येत्या आठ दिवसांनंतर तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाचा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.

आडगाव चोथवा येथील शेतकरी दामोदर पवार यांनी आपल्या गट क्रमांक 208 मधील शेतात दोन एकर 86032 जातीच्या उसाची लागवड केली होती. मात्र दोन एकरातील अडीच महिन्यांचा ऊस जळाल्याने दुकानदाराची भेट घेतल्यानंतर तो उडवाउडवीची उत्तरे  देत असल्याने पवार यांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली आहे.

येत्या आठ दिवसांत संबंधित दुकानदार आणि कंपनीकडून आर्थिक नुकसानभरपाई न मिळाल्यास कृषी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा तक्रारीत दिला आहे. तक्रारीच्या प्रति पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, कृषिमंत्री दादा भुसे, पालकमंत्री छगन भुजबळ, जिल्हाधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, शहर पोलीस निरीक्षक यांना पाठविल्या आहेत.

चुकीच्या औषधांनीच घात केला

8 जुलै रोजी शहरातील तुळसाई ऍग्रो हायटेक या दुकानातून पवार यांनी दुकानदाराच्या सल्ल्याने उसाच्या शेतातील तणावर फवारणीसाठी वीडमार सुपर, ग्रामोझोन आणि ऍग्रो स्प्रेड ही औषधे घेतली. 9 जुलै रोजी पवार यांनी उसाच्या शेतात या औषधांची फवारणी केल्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी 10 जुलैला संपूर्ण ऊस जळून खाक झाला.