
कोरोनाच्या काळात ग्रामीण भागातील लोकांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी त्यांना होमिओपॅथिक औषध आणि संशमनोवटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मात्र याबाबत चुकीची माहिती सांगून लोकांची दिशाभूल केली. यामुळे सरकारची बदनामी झाली असून याप्रकरणी चंद्रकांत पाटील यांनी सरकारची माफी मागावी. तसे न केल्यास फौजदारी दावा दाखल करण्याची वेळ येईल, असा इशारा ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना दिला आहे.
कोरोना रोखण्यासाठी ग्रामीण भागात आर्सेनिक अल्बम हे होमिओपॅथिक औषध व संशमनोकटी हे आयुर्वेदिक औषध मोफत देण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला. हे औषध खरेदीचे अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात आले. मात्र या औषधाच्या किमतीवरून सरकारवर टीका करीत 2 रुपयांचे औषध 23 रुपयांना खरेदी केल्याची चुकीची माहिती प्रसारमाध्यमांसमोर सांगण्यात आली. यावर खुलासा करीत ग्रामविकासमंत्र्यांनी यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या, मात्र निविदेतील दरांपेक्षा अधिक दर आल्याने त्या रद्द करण्यात आल्या. हे अधिकार जिल्हा परिषदांना देण्यात आल्याचे स्पष्ट केले. मात्र चंद्रकांत पाटील यांच्या चुकीच्या भाष्यामुळे सरकारची बदनामी झाली असून त्यांनी माफी मागावी अन्यथा फौजदारी दावा करावा लागेल, असा इशारा हसन मुश्रीफ यांनी चंद्रकांत पाटील यांना पत्राद्वारे दिला आहे.





























































