खूशखबर! यावर्षी मुंबईकरांचे पाणी महागणार नाही!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पालिकेच्या दरवर्षी होणाऱया 8 टक्के पाणीपट्टी वाढीतून यावर्षी मुंबईकरांची सुटका झाली आहे. जल विभागाने पाणीपट्टी वाढीसाठी पालिका आयुक्तांकडे जूनमध्ये पाठवलेल्या प्रस्तावावर अद्याप निर्णय झालेला नाही. या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या पाणीपट्टी वाढवण्यात येणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

मुंबईकरांना दररोज पालिकेकडून 3800 दशलक्ष लिटर शुद्ध पाण्याचा पुरवठा केला जातो. हे पाणी मुंबईपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या सात तलावांमधून आणले जाते. हे पाणी आणण्यासाठी जल अभियंता खात्याचा आस्थापना खर्च, प्रशासकीय खर्च, देखभाल खर्च, विजेचा खर्च, शासकीय धरणातून उपसा केलेल्या पाण्याची पाणीपट्टी यांच्या खर्चात दरवर्षी वाढ होत असते. या पार्श्वभूमीवर वाढणारा खर्च भागवण्यासाठी पालिकेत 2012मध्ये दरवर्षी किमान 8 टक्के दरवाढ करण्याचा प्रस्ताव बहुमताने मंजूर करण्यात आला आहे. यानुसार दरवर्षी पाणीपट्टी वाढवण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाच्या प्रभावात पालिकेने पाणीपट्टी वाढवू नये अशी मागणी मुंबईकरांकडून करण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर पालिकेने पाणीपट्टी न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, गेल्या वर्षी झालेल्या 8 टक्के पाणीपट्टी दरवाढीमुळे पालिकेला आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये मध्ये 27.97 कोटींचा महसूल मिळाला होता.

सध्याचे प्रति हजार लिटर पाण्याचे दर
वापराचा प्रकार दर (रुपये)
घरगुती ग्राहक – 3.91
झोपडपट्टीतील ग्राहक- 4.33
इमारतीतील घरगुती ग्राहक- 5.22
बिगर व्यावसायिक संस्था – 20.91
व्यावसायिक संस्था – 39.20
उद्योग, कारखाने आदी – 52.25
रेसकोर्स, तारांकीत हॉटेल्स – 78.89
शितपेये, बाटलीबंद पाणी उत्पादक – 108.89

मुंबईकरांना पाणीपुरवठा करण्यासाठी होणाऱया खर्चात दरवर्षी होणाऱया वाढीमुळे पाणीपट्टी वाढवण्यात येते. मात्र यावर्षी कोरोनाचा प्रभाव असल्यामुळे पाणीपट्टी वाढवण्याचा कोणताही विचार सध्या नाही. – इकबाल सिंह चहल, पालिका आयुक्त