कोरोनामुळे प्रवेश प्रक्रियांचे ‘बारा’ वाजले, पुढील आठवड्यात वेळापत्रक जाहीर होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मोठय़ा अडथळ्यांनंतर बारावीचा निकाल जाहीर झाला मात्र आता पुढील अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियेचे काय होणार असा प्रश्न विद्यार्थी-पालकांना पडला आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असून त्यामुळे विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशप्रक्रियांचे ‘बारा’ वाजले आहेत. व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱया सीईटी परीक्षेचे वेळापत्रक अद्याप जाहीर झालेले नाही. ऑगस्ट अखेरीस किंवा सप्टेंबर महिन्यात सीईटी परीक्षा होणार असून या परीक्षेचे वेळापत्रक पुढील आठवडय़ात जाहीर होणार आहे.

सीईटी सेलच्या वतीने राज्यातील अभियांत्रिकी, औषध निर्माणशास्त्र आणि कृषी पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेण्यात येते. या परीक्षेसाठी राज्यातील 5 लाख 24 हजार 907 विद्याथ्र्यांनी नोंदणी केली आहे. ही परीक्षा 4 जुलै ते 5 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. मात्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कायम असल्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. सीईटी परीक्षेची नवी तारीख जाहीर झालेली नाही. त्यामुळे ही परीक्षा कधी होणार याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने जेईई मेन परीक्षा 1 ते 6 सप्टेंबर, जेईई ऍडव्हान्स 27 सप्टेंबर, तर नीट परीक्षा 13 सप्टेंबरमध्ये घेण्याचे ठरविले आहे. या परीक्षा आयबीपीएस ही एकमेव संस्था घेते. यंदा कोरोनामुळे या परीक्षांचे वेळापत्रक बिघडले असल्याने या संस्थेला सर्व परीक्षा सप्टेंबर महिन्यात घ्याव्या लागत आहेत.
सीईटी सेलकडून परीक्षा ऑगस्ट महिन्याच्या अखेरच्या आठवडयात किंवा सप्टेंबर महिन्यात आयोजित करण्यासंदर्भात आयबीपीएस या संस्थेकडे पाठपुरावा सुरू आहे.
त्यानुसार लवकरच सीईटी परीक्षेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. सीईटी परीक्षा सुमारे 14 दिवस चालेल अशी माहिती सीईटी सेलकडून मिळाली.