
आपलं नशीब आपण घडवतो, पण आपण जे जगलो ते आपलंच नशीब असतं की आणखी कुणीतरी आधीच ते जगलेलं असतं.. अशा भन्नाट थीमवर बेतलेली समांतर नावाची एक वेबसीरीज काही महिन्यांपूर्वी आली होती. आता त्याचा दुसरा भागही प्रदर्शित होणार आहे.
समांतर या वेबसीरीजमध्ये कुमार महाजन या सामान्य माणसाचा आयुष्याचा रोमांचकारी प्रवास दाखवण्यात आला होता. कुमार महाजनचा या सामान्य माणसाचं आयुष्य बदलत ज्यावेळी त्याला समजत सुदर्शन चक्रपाणि या व्यक्तिचा भूतकाळ हा त्याचा भविष्यकाळ ठरणार आहे, असा कथापट होता. सुहास शिरवळकर या प्रसिद्ध लेखकाच्या लेखणीतून उतरलेल्या या कथेला वेब माध्यमातून साकारण्यात आलं होतं. या वेबसीरीजमध्ये स्वप्नील जोशी याने कुमार महाजन ही भूमिका केली होती. तर सुदर्शन चक्रपाणि ही भूमिका अभिनेता नीतिश भारद्वाज यांनी साकारली होती. ही वेबसीरीज चांगलीच गाजली होती.
आता या वेबसीरीजचा पुढचा भाग लवकरच भेटीला येणार आहे. या दुसऱ्या भागाचं सूतोवाच स्वप्नील जोशी याने केलं आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्याने चाहत्यांना या दुसऱ्या भागाविषयीची माहिती दिली आहे. मात्र, हा दुसरा भाग कसा असेल, त्यात कोणकोणत्या व्यक्तिरेखा असतील, हे मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे.

























































