
सध्या घराणेशाहीवरून चांगलाच वाद पेटला आहे. पण घराणेशाहीव्यतिरिक्त अनेक गोष्टी आहेत, ज्या या चंदेरी दुनियेचं सत्य वारंवार अधोरेखित करतात. बॉलिवूडच्या चकाकत्या दुनियेत उगवत्या सूर्यालाच रामराम केला जातो आणि मावळत्याकडे पाठ केली जाते. त्यामुळे अनेकदा चित्रपटात सातत्याने दिसणारे कलाकार अचानक बॉलिवूडमधून नाहीसे होतात.

90च्या दशकात खलनायकाच्या सहाय्यकाची भूमिका करणाऱ्या गॅविन पॅकार्ड नावाच्या अभिनेत्याचंही काहीसं असंच झालं. चंदेरी दुनियेत पाऊल ठेवून त्याने आघाडीच्या कलाकारांसोबत काम केलं. मूळचा कल्याणच्या असणाऱ्या गॅविन यांचे वडील परदेशी होते तर आई मराठी महिला होती. वयात येताना गॅविन यांना शरीर कमावण्याचा छंद जडला. त्यांच्या त्या आवडीमुळे आणि त्यांच्या काहीश्या परदेशी चेहऱ्यामुळे त्यांना बॉलिवूडमध्ये खलनायकाच्या सहाय्यकाची भूमिका मिळू लागल्या. इलाका, सडक, थानेदार, पत्थर के फूल, हलचल अशा वेगवेगळ्या 60 चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलं. त्यांचं शरीरसौष्ठव पाहून अनेक नायक शरीर कमावण्याकडे लक्ष देऊ लागले.

या दरम्यान त्यांनी संजय दत्त, सुनील शेट्टी, सलमान खान अशा अनेकांना शरीरसौष्ठव कमवण्यासाठी मदत केली. 2002नंतर मात्र काही वैयक्तिक कारणामुळे ते सिनेसृष्टीतून दूर झाले. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी घटस्फोटासारखी वादळं सहन केली. 2002 ते 2012 या दशकात ते संपूर्णपणे लुप्त झाले होते. त्यांच्या आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात 2010 मध्ये त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर ते अंथरुणाला खिळून होते. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर ते वसई येथे भावाकडे वास्तव्याला होते. 2012 मध्ये त्यांचं निधन झालं. एकेकाळी खलनायक म्हणून गाजलेले गॅविन अखेरच्या काळात अत्यंत एकाकी जीवन जगत होते. त्यांच्याशी वैयक्तिक ओळख असलेल्या कुठल्याही कलाकाराने त्यांना मदत केली नाही अथवा त्यांच्या मृत्युनंतर अंत्यदर्शनालाही जायची तसदी घेतली नाही.



























































