
येत्या मंगळवारपासून नाशिकमधील प्रतिबंधित क्षेत्रांमध्ये वीस मोबाईल दवाखान्यांच्या माध्यमातून आरोग्य तपासणी करण्यात येईल. ऑण्टिजेन चाचणीमुळे अवघ्या अर्ध्या तासात कोरोना संशयितांचा अहवाल जागेवरच मिळणे शक्य होईल. इतर आजाराने ग्रस्त रुग्ण, वृद्धांना ही सुविधा उपयुक्त ठरेल, असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी सांगितले.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी आयुक्तांनी रविवारी फेसबुकद्वारे संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शहरातील रुग्णसंख्या, सुविधा, घ्यावयाची काळजी याविषयी सांगितले. प्रतिबंधित क्षेत्रात चारशे पथकांद्वारे सर्वेक्षण, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याचे ते म्हणाले. मोठय़ा प्रमाणावर तपासणी होत असल्याने रुग्णसंख्या वाढत आहे. महापालिकेला भारतीय जैन संघटना वीस मोबाईल दवाखाने उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बिटको रुग्णालयात 300, समाजकल्याण विभाग वसतिगृहात 500, मेरी येथे 200, तर ठक्कर डोम येथे साडेतीनशे खाटांची व्यवस्था आहे. खाजगी रुग्णालयांमध्येही बेड आरक्षित असून, भविष्यात गरज पडल्यास आणखी बेडची व्यवस्था करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
महापालिकेच्या वेबबेस प्लॅटफॉर्मवर खासगी रुग्णालयातील बेड उपलब्धतेबाबत अद्ययावत माहिती दिली जाईल, असे ते म्हणाले. तरुण कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढताना दिसत आहे त्यांनी आरोग्य व स्वच्छताविषयक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.
























































