रद्द तिकिटांचा रिफंड 180 दिवसांत केव्हाही मिळणार, पश्चिम रेल्वेने आतापर्यंत 400 कोटी परत केले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
western-railway-local
प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनमुळे रेल्वेच्या रद्द झालेल्या प्रवासी गाडय़ांच्या तिकिटांचा परतावा मिळण्यास सुरूवात झाल्यानंतर प्रवाशांनी तिकीट खिडक्यांवर एकच गर्दी केली आहे. मात्र, कोणत्याही तिकीट रद्दीकरण शुल्काशिवाय प्रवासाच्या तारखेपासून 180 दिवसांत केव्हाही रिफंड मिळणार असल्याने प्रवाशांनी गर्दी टाळावी असे पश्चिम रेल्वेने म्हटले आहे. 11 जुलैच्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वेने सुमारे 400 कोटींचा रिफंड प्रवाशांना दिला आहे.

कोरोनामुळे 22 मार्चपासून सर्व प्रवासी सेवा ठप्प झाल्याने अनेकांनी आगाऊ तिकीट काढलेल्या गाडय़ा रद्द झाल्या. रेल्वेने ऑनलाइन तिकीट काढणाऱयांचा रिफंड त्यांच्या खात्यावर तातडीने जमा केला. त्यानंतर ज्यांनी तिकीट खिडक्यांवरून तिकिटे काढली होती, त्यांनाही रेल्वेच्या प्रवासी आरक्षण केंद्रांमधून (पीआरएस) रद्द तिकिटांचा रिफंड देण्यास सुरुवात केली आहे. 11 जुलैच्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वेने सुमारे 400 कोटींचा रिफंड प्रवाशांना दिला आहे.

अन्नपदार्थांच्या वाहतुकीतून 24 कोटी मिळाले
कोरोनाच्या साथीतही 23 मार्च ते 17 जुलैपर्यंत पश्चिम रेल्वेने आपल्या 405 विशेष पार्सल गाडय़ांद्वारे 78,000 टन वजनाच्या जीवनाश्यक खाद्यपदार्थांची वाहतूक केली आहे. ज्यात कृषीजन्य उत्पन्ने, औषधे, मासे, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंचा समावेश आहे. यातून पश्चिम रेल्वेला 24.81 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे.

61 लाख प्रवाशांना रिफंड मिळाला
पश्चिम रेल्वेला कोरोना संकटामुळे ट्रेन बंद असल्याने 1770 कोटींचा फटका बसला आहे. त्यात उपनगरीय सेक्शनचे नुकसान 260 कोटी रुपये तर बिगर उपनगरीय सेक्शनचे नुकसान 1509 कोटी रुपये इतके आहे. 1 मार्च ते 11 जुलैपर्यंतच्या आकडेवारीनुसार पश्चिम रेल्वेने 397 कोटी 13 लाख रुपयांचा परतावा दिला आहे. या रिफंडमध्ये एकटय़ा मुंबई डिव्हिजनचीच 189 कोटी 70 लाख रुपयांहून अधिक रक्कम झाली आहे. आतापर्यंत पश्चिम रेल्वेने 61.01 लाख प्रवाशांना रिफंड दिला आहे.