
कोरोना संकटकाळात गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक गैरमार्गाने पैसा कमावण्यासाठी रुग्णांच्या जीवाशी खेळत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गुजरातमध्ये ‘टोसिलिझुमॅब’च्या नावावर नकली इंजेक्शनचा पुरवठा करणाऱया रॅकेटचा पर्दाफाश ‘एफडीआय’ने केला आहे.
अहमदाबादमदील संजीवनी रुग्णालयात सेवा देत असलेल्या एका डॉक्टरला रुग्णावर उपचार करत असताना टेसिलिझुमॅब इंजेक्शनबाबत शंका आली. रुग्णाच्या नातेवाइकांकडून मेडिकल स्टोअर्सची माहिती घेत अधिक चौकशी केली असता, मेडिकल स्टोअरच्या मालकाने ते इंजेक्शन सूरतमधील सोहेल इस्माइल याच्याकडून घेतल्याचे समोर आले. अन्न औषध प्रशासनाने या माहितीच्या आधारे इस्माइलच्या घरावर छापा टाकत नकली इंजेक्शनचा साठा जप्त केला.
या प्रकरणी सोहेल इस्माइल, नीलेश लालीवाला, अक्षय शाह, हर्ष ठाकोर आणि आशीष शाह या पाच जणांना अटक करण्यात आली. या टोळीकडून अंदाजे 8 लाख रुपये किमतीची टोसिलिझुमॅबची बनावट इंजेक्शन जप्त करण्यत आली आहेत. या प्रकरणी अधिक शोध सुरू असल्याचे एफडीआयचे प्रमुख एच. जी. कोशिया यांनी सांगितले.



























































