धाराशिवमधील  कोविड – 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआरची मान्यता, उद्यापासून टेस्टींग सुरु होण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona-test-11

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या धाराशिव येथील उपकेंद्रात उभारण्यात आलेल्या कोवीड – 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआरने मान्यता दिली असून उद्यापासून या लॅबमध्ये स्वॅब टेस्टींगचे काम सुरु होणार आहे. त्यामुळे जिह्यातील कोरोना चाचण्याचा रिपोर्ट प्रशासनास लवकर उपलब्ध होणार आहे. धाराशिची ही लॅब महाराष्ट्रातील तिसरी नॉन मेडीकल लॅब आहे.

सध्या जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोना रुग्णाचा आकडा दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे. शेजारील प्रत्येक जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने तेथील स्थनिक लॅबवर ताण पडत असल्याने तसेच जिह्यात कोविड टेस्टींग लॅब नसल्याने स्वॅब तपासणीसाठी बराच वेळ लागत आहे.

धाराशिवमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्रात सुक्ष्मजीवशास्त्र विभाग असून या ठिकाणी सुसज्ज प्रयोगशाळाही होती. येथील विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य संजय निंबाळकर यांच्या पुढाकाराने येथील उपकेंद्रात सुमारे एक कोटी रुपये खर्च करुन कोविड – 19 टेस्टींग लॅब उभारण्यात आली आहे. विशेष म्हणजे ही संपुर्ण लॅब लोकसहभागातून उभारण्यात आली आहे.

आज येथील कोविड – 19 टेस्टींग लॅबला आयसीएमआर म्हणजेच भारतीय आयुर्विज्ञान संस्था नागपूरच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे. याबद्दलचे पत्र आज सायंकाळी विद्यापीठ उपकेंद्रास प्राप्त झाले आहे. त्यामुळे येथील कोविड – 19 टेस्टींग लॅबमध्ये उद्यापासून स्वॅब टेस्टींगचे काम सुरु होणार आहे.

संजय निंबाळकर यांचा सिंहाचा वाटा  
संजय निंबाळकर हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य आहेत. धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ उपकेंद्राच्या विकासात त्यांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. तसेच जिह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मागील अडीच महिन्यापासून विद्यापीठ उपकेंद्रातील कोविड  – 19 टेस्टींग लॅब सुरु होण्यासाठी त्यांनी स्वतःला वाहून घेतले होते. टेस्टींग लॅब उभारणीपासून यासाठी लागणारी सर्व यंत्रणा, निधी उभा करणे, प्रयोगशाळेसाठी लागणार्‍या विविध परवानग्यासाठी ते सतत पाठपुरावा करत होते.