परिस्थितीचा नेटाने मुकाबला करायला हवा, डेम्पो क्लबची तांत्रिक संचालक अंजू तुरंबेकरचे उद्गार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अखिल हिंदुस्थानी फुटबॉल फेडरेशनची इन्स्ट्रक्टर, आशियाई फुटबॉल कॉन्फेडेरेशनची ग्रासरूट पॅनेल सदस्य, तांत्रिक एक्सपर्ट व डेम्पो स्पोर्टस् क्लबची टेक्निकल संचालक या तीन महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असलेल्या कोल्हापूरच्या अंजू तुरंबेकर हिने कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा समर्थपणे, नेटाने मुकाबला करायला हवा असे स्पष्ट मत दैनिक ‘सामना’ला दिलेल्या मुलाखतीदरम्यान व्यक्त केले.

लॉकडाऊनमध्ये शेतामध्ये फुटबॉल खेळायची
मी काही महिने आधीच गोव्यातील डेम्पो या क्लबशी जोडले गेले. 21 मार्च रोजी एका आठवडय़ासाठी गावी येण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यानंतर कोरोनामुळे हिंदुस्थानात लॉकडाऊनचा निर्णय घेण्यात आला. तिथपासून 31 मेपर्यंत गावीच राहिले. या कालावधीत फिटनेससाठी वर्कआऊट केले. लहानपणापासून डान्सची आवड होती. त्याकडेही लक्ष दिले. बऱयाच वर्षांनंतर आमच्या शेताकडे जायला मिळाले. शेतामध्ये फुटबॉल खेळण्याचा आनंदही घेतला, असे अंजू तुरंबेकर यावेळी म्हणाली.

या काळातही व्यावसायिकता जपली
डेम्पो हा क्लब देशातील अव्वल व्यावसायिक क्लबमध्ये गणला जातो. त्यामुळे काही नियम शिथिल करण्यात आल्यानंतर या क्लबशी जोडल्या गेलेल्या फुटबॉलपटूंसाठी ऑनलाइन प्रशिक्षण शिबिराला सुरुवात करण्यात आली. यामध्ये स्ट्रेंग्थ, बॅलन्स, फिजिकल या सर्व बाबींवर दृष्टिक्षेप टाकण्यात आला. कोरोना संकट टळल्यानंतर जेव्हा फुटबॉल सुरू होईल तेव्हा खेळाडूंना कोणताही अडथळा येऊ नये यासाठी हे सर्व करण्यात येत आहे, असे अंजू तुरंबेकर म्हणाली.

घरी बसून खेळाडूंना बक्षिसे जिंकण्याची संधी
डेम्पो क्लबकडून एका वर्षाचे कॅलेंडर तयार करण्यात येते. प्रत्येकाचा रिपोर्ट बनवावा लागतो. ऑनलाइन शिबिरामध्ये प्रत्येक खेळाडूंच्या कमकुवत बाजूंवरही लक्ष देण्यात येते. पुढच्या शिबिरामध्ये काय बदल करायला हवे याबाबत मार्गदर्शन केले जाते. तसेच खेळाडूंच्या पालकांशीही आम्ही सातत्याने संपर्कात असतो. लॉकडाऊनमध्ये खेळाडूंचा उत्साह वाढवण्यासाठी विशेष स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या. उदा. जो खेळाडू सर्वात चांगला बॅलन्स कंट्रोल करील, त्याला बक्षीस दिले जाईल. अशा परीक्षांमध्ये जिंकणाऱया खेळाडूंना जेव्हा सर्व व्यवस्थित सुरू होईल तेव्हा बक्षिसे देण्यात येतील, असे अंजू तुरंबेकर यावेळी म्हणाली.

फिफाच्या नियमांचे पालन करायलाच हवे
कोरोनामुळे नक्कीच फुटबॉलमध्येही बदल झालेले दिसतील. फिफा या जागतिक फुटबॉल संघटनेकडून तयार करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावेच लागेल. आता खेळाडूंच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य दिले जाईल. स्टेडियमनजीक सर्व ठिकाणी सॅनिटायझेशन अत्यावश्यक असेल, असे अंजू तुरंबेकर यावेळी आवर्जून म्हणाली.