
>> वृषाली पंढरी
श्रावणातील एक अस्सल ग्रामीण मराठमोळा सण म्हणजे नागपंचमी. लहान गावात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील हा सण वेगळ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमी हल्ली तशी कमी प्रमाणात साजरी केली जाते आहे. नागपंचमीही आता पूर्वीसारखी साजरी होत नाही. प्राचीन हिंदुस्थानी लोकांनी नाग मारले जाऊ नयेत म्हणून देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले. विविध प्रकारचे साप हे शेतकर्यांचे मित्र आहेत. धान्य मोठय़ा प्रमाणावर फस्त करणारे उंदीर हे सापांचे मुख्य अन्न असल्याने उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निसर्गात साप असणे आवश्यक आहे.
देशात जवळपास प्रत्येक महिन्यात कुठला तरी सण असतोच असतो; पण महाराष्ट्राचा विचार करता श्रावण महिन्याला सणांचा राजाच म्हणावा लागेल.प्रत्येक मंगळवारी येणारी मंगळागौर,श्रावणातील सोमवारांचे शिवभक्तांना असलेले महत्त्व,नागपंचमी,रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा, श्रीकृष्णजन्माष्टमी आणि दहीहंडी,आणि शेवटी येणारा बैलपोळा व पिठोरी अमावास्या अशी सणांची रेलचेल तर असतेच,पण पाऊस पडत असल्याने हिरवागार झालेला निसर्गही सणाचा आनंद द्विगुणित करत असतो.
अशा या हसर्या, लाजर्या श्रावणातील एक अस्सल ग्रामीण मराठमोळा सण म्हणजे नागपंचमी. लहान गावात, विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातील हा सण वेगळ्या उत्साहात साजरा केला जातो. रंगपंचमी हल्ली तशी कमी प्रमाणात साजरी केली जाते आहे. नागपंचमीही आता पूर्वीसारखी साजरी होत नाही. यंदा कोरोनामुळे बंधने आल्याने ठीक, पण एकंदरीत पूर्वीची नागपंचमी आता राहिली नाही. माझे बालपण पश्चिम महाराष्ट्रातील खेडय़ात गेले.मला आठवतेय,नागपंचमीला मुले पतंग,वावडय़ा उडवीत असत. हल्ली गुजरातप्रमाणे संक्रांतीला पतंग उडविले जातात. वावडी आता इतिहासजमा झाली आहे. पूर्वी नागपंचमीच्या महिनाभर अगोदर रात्री गावातील महिला व मुली एकत्र जमून फेर धरीत. सामुदायिक गाणी गात असत. गाण्यातून रामायण, महाभारत, विठ्ठल-रुक्मिणी, सासुरवाशिणींचे प्रश्न यावर आधारित लोकगीते गायली जायची. झिम्मा-फुगडीसारखी नृत्ये व खेळ खेळले जायचे. हल्ली घरोघरी टीव्ही आल्याने अशा गोष्टी जवळपास बंद होत आल्या आहेत.
या सणाला बर्याच ठिकाणी अजूनही नवविवाहित बहिणीला तिचा भाऊ माहेरी घेऊन येण्याची पद्धती रूढ आहे. नागपंचमीला स्त्रिया व मुली झाडाला झोके बांधून गाणी म्हणत झोके घेतात .पूजेला जाण्यासाठी हाताला मेंदी लावण्याची पद्धतही हौसेचा भाग रूढ झालेली दिसते.
नागपंचमीला घरोघरी नागाची पूजा करून नागदेवतेला प्रसन्न करण्याची पद्धत आहे.कालिया नागाचा पराभव करून यमुना नदीच्या पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुरक्षित वर आले तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. त्या दिवसापासून नागपूजा प्रचारात आली असे मानले जाते. दर बारा वर्षांनी नागपंचमीच्या दिवशी देशभरातील नाथ संप्रदायाचे लोक गंगा-गौतमी उर्फ अहिल्या-गौतमी संगमावर स्नान करतात.
या सणाची आणखी एक आख्ययिका आहे. एका शेतकर्याच्या नांगराच्या फाळाने नागिणीची तीन पिल्ले मृत्युमुखी पडली व त्यामुळे नागदेवतेचा कोप झाला अशी समजूत प्रचलित आहे. त्यामुळे या दिवशी शेतकरी आपल्या शेतात नांगरत नाही.कोणीही खणत नाही. घरी भाज्या चिरायच्या नाही, तवा वापरायचा नाही व कुटायचे नाही असे काही नियम पालन करण्याची प्रथा आहे.त्यामुळे पुरण घालून केलेले मांडे किंवा दिंडं खायची प्रथा आहे. श्रद्धाळू नागदेवतेची पूजा करून तिला दूध-लाह्यांचा व गव्हाच्या खिरीचा नैवेद्य दाखवतात व आमचे संरक्षण कर अशी प्रार्थना करतात.खरे तर दूध-लाह्या या माणसाच्या आवडीच्या गोष्टी नागांना दिल्या जातात, पण ते त्यांचे अन्न नाही हे लक्षात ठेवले पाहिजे.
काही ठिकाणी नागाच्या वारुळापाशी महिला गाणी म्हणत जातात आणि वारुळाची पूजा करतात. अनंत म्हणजेच शेष, वासुकी, पद्मनाभ, कम्बल, शंखपाल, धृतराष्ट्र, तक्षक आणि कालिया या 8 नागांची या दिवशी पूजा केली जाते.मात्र खालील श्लोकात वासुकी, तक्षक, कालिय, मणिभद्रक, ऐरावत, धृतराष्ट्र, कर्कोटक आणि धनंजय, असे वेगळे नाग सांगितले आहेत.
वासुकिः तक्षकश्चैव कालियो मणिभद्रकः।
ऐरावतो धृतराष्ट्रः कर्कोटकधनञ्जयौ ।
(भविष्योत्तरपुराण – 32-2-7)
हिंदुस्थानी संस्कृतीत अनेक प्रकारे नागांची पूजा केली जाते. नाग म्हणजे फणाधारी सर्प. याच्या फणेवर पुढच्या बाजूने दहाच्या अंकासारखे चिन्ह असते. नागाचा रंग हिरवट किंवा पिवळा असतो. त्याच्या तोंडात विष धारण करणारे दात असतात. नागाची जीभ दुभंगलेली असते. प्राचीन हिंदुस्थानी लोकांनी नाग मारले जाऊ नयेत म्हणून देवत्व देऊन त्याला पूजा विषय बनवले. विविध प्रकारचे साप हे शेतकर्यांचे मित्र आहेत. धान्य मोठय़ा प्रमाणावर फस्त करणारे उंदीर हे सापांचे मुख्य अन्न असल्याने उंदरांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी निसर्गात साप असणे आवश्यक आहे.
सांगली जिल्हय़ाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील शिराळा हे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी पूर्वी प्रसिद्ध होते. कालौघात काही अनिष्ट पद्धती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील हा वैशिष्ट्यपूर्ण उत्सव आता इतिहासजमा झाला आहे.
पूर्वी नागपंचमीचा हा उत्सव शिराळ्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जायचा. तेव्हा नागपंचमीच्या महिनाभर अगोदर येथील नाग मंडळे नाग पकडायच्या मोहिमेला निघत. हातात लांब काठी आणि नागाला ठेवण्यासाठी मडके असा लवाजमा घेऊन तरुणांचे ग्रूप विविध प्रकारचे साप पकडत. पकडलेल्या नाग, साप, धामण यांची नागपंचमी उत्सव संपेपर्यंत योग्य प्रकारे काळजी घेतली जाई.नागपंचमीच्या दिवशी शिराळा गावात ग्रामदेवतेची पूजा करून शेकडो नाग व सापांची एकाच वेळी मिरवणूक काढली जाई. त्यानंतर नागाचे खेळ आयोजित केले जात. सर्वात उंच फणा काढणारा नाग, सर्वात लांब नाग अशा पकडलेल्या मंडळांना बक्षिसे मिळत. नागपंचमीस नागाचे खेळ पाहण्यासाठी हजारो नागरिक येत. विशेष म्हणजे अगदी 2 वर्षांच्या बालकापासून ते 80 वर्षांच्या म्हातार्यापर्यंत सर्वजण न घाबरता गळ्यात नाग/धामण घालून फोटो काढत.
शिराळ्याची ही नागपंचमी पूर्वी देशातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध होती. नागपंचमीसाठी पूर्वी लाखभर लोक जमायचे. परंतु, सापांचे होणारे हाल पाहून येथील निसर्ग व वन्यजीवपेमींनी थेट मुंबई हायकोर्टात धाव घेतली. कोर्टाने वन्य जीव संरक्षण 1972 कायद्यानुसार 2002 मध्ये आदेश देऊन सापांना पकडणे, त्यांचा खेळ करणे तसेच मिरवणूक काढणे, प्रदर्शन करणे, त्यांच्या स्पर्धा भरवणे यांना बंदी केली. यंदाही सरकारने कठोर आदेश काढले आहेत. त्यामुळे काही वर्षांपासून बत्तीस शिराळ्यात फक्त प्रतीकात्मक मिरवणूक काढली जाते.





























































