
जम्मू कश्मीरच्या पारिपोरामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी सकाळी चकमक झाली. या चकमकीत सुरक्षा दलाने दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला असून एका जवानाला गोळी लागल्याने तो जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुरक्षा दलाने परिसराची नाकाबंदी करून दहशतवादी लपलेल्या भागाला घेराव घातला आहे. सुरक्षा दलाची शोधमोहिम सुरू आहे.
श्रीनगरच्या पारिपोरामध्ये दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर श्रीनगर पोलीस, 29 राष्ट्रीय रायफल्स आणि सीआरपीएफच्या जवानांनी एकत्रित शोधमोहीम हाती घेतली. दहशतवादी लपलेल्या भागाला सुरक्षा दलाने घेराव घातला. सुरक्षा दलाने घेरल्यानंतर दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल जवानांनी केलेल्या कारवाईत दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सुरक्षा दलाने ठार केलेले दहशतवादी लश्कर ए तोयबा या दहशतवादी संघटनेचे असल्याची माहिती मिळाली आहे. या चकमकीत दहशतवाद्यांच्या गोळीबारात जखमी झालेल्या जवानाला लष्करी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
























































