
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रासह विविध ठिकाणी विनाकारण भटकंती करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक कारवाई केली आहे. त्यानुसार 4 ते 24 जुलै कालावधीत तब्बल 17 हजार 137 नागरिकांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामध्ये विनापरवानगी संचार करणाऱ्या सर्वाधिक 4 हजार जणांचा समावेश आहे.
कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाल्यामुळे पोलीस प्रशासनाकडून कडक कारवाई करण्यात येत आहे. त्यानुसार वाहतूक विभागासह पोलिस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण फिरणाऱ्याविरुद्ध कारवाईची मोहिम हाती घेण्यात आली आहे. पोलिसांकडून 4 ते 24 जुलैअखेर विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत विशेष मोहिम राबविण्यात आली. त्यानुसार 271 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. कारवाईसाठी 235 अधिकारी आणि 1 हजार 326 कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यानुसार वेगवेगळ्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली. त्यामध्ये कलम 188 नुसार तब्बल 6 हजार 637 जणांवार कारवाई करण्यात आली. त्याशिवाय विनापरवानगी फिरणाीऱ्या तब्बल 4 हजार जणांवर कारवाई करण्यात आली. विनामास्क 2 हजार 657 नागरिकांसह कारणाशिवाय वाहनांवर प्रवास करणाऱ्या 1 हजार 267 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई करण्यात आली. प्रतिबंधित क्षेत्रातही नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन केले जात आहे. विशेषतः किरकोळ व्यवसायिक, छोटे-मोठे दुकानदार यांच्याकडून सोशल डिस्टन्स पाळला जात नसल्याचे दिसून आले आहे. शहरातील विविध भागात कोरोनाचा संसर्ग वेगाने होत असल्यामुळे नागरिकांनी विनाकारण घराबाहेर फिरु नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
लॉकडाउनमध्ये प्रतिबंधित क्षेत्रात विनामास्क भटकंती, सोशल डिस्टन्स न पाळणे, ट्रीपलसीट, मोटारीतून कारणांशिवाय प्रवास करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात आली आहे. सर्वच पोलीस ठाण्यातंर्गत हद्दीतील बेशिस्त नागरिकांवर दंडात्मक आणि वाहनजप्तीची कारवाई करण्यात आली. कोरोनाचा धोका संपला नसून नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून पोलिसांना सहकार्य करावे. – बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा
























































