गोव्यात गेल्या 24 तासात कोविडचे विक्रमी 258 रुग्ण सापडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गोव्यात आज एका दिवसात कोविडचे विक्रमी 258 रुग्ण सापडले. 133 जण बरे झाले असले तरी न्यू वाडे-वास्को येथील 58 वर्षीय इसमाचा काल कोविड हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाल्यामुळे एकूण मृतांचा आकडा 36 झाला आहे. अजुन देखील 1 हजार 673 रुग्ण विविध ठिकाणी उपचार घेत आहेत.

आज पार पडलेल्या एक दिवसीय अधिवेशनात देखील कोविडच्या संकटाचे पडसाद उमटले. पूर्व नियोजित दीर्घकालीन विधानसभा अधिवेशन कोविडच्या वाढत्या संकटामुळे एक दिवसीय करण्यात आले होते. आजच्या अधिवेशनात कोविडसह सध्याच्या गंभीर विषयावर चर्चा व्हावी, अशी मागणी विरोधकांनी स्थगन प्रस्तावाद्वारे केली होती. सभापतींनी तो प्रस्ताव फेटाळल्या नंतर विरोधकांनी सभात्याग करत राजभवन गाठले आणि राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्याकडे सरकारच्या भूमिके विषयी तक्रार केली. त्याच वेळी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सरकार कोविड संकटाचा सामना करत असून विरोधक आपल्या सूचना करून सहकार्य करण्याऐवजी राजकारण करत असल्याचा आरोप केला.

गोव्यात आतापर्यंत 5 हजार 119 रुग्ण सापडले असून त्यातील 3 हजार 410 रुग्ण बरे झाले आहेत. 1 हजार 673 जण उपचार घेत असून मृतांचा आकडा वाढत 36 जाऊन पोहचला आहे. रस्ता, विमान, रेल्वे मार्गे गोव्यात दाखल झालेले देखील कोविडग्रस्त होऊ लागल्याने गोव्याची चिंता वाढली आहे. आतापर्यंत 103 जण गोव्यात येऊन कोविडग्रस्त झाले आहेत.

उत्तर गोव्यात आरोग्यकेंद्र निहाय आकडेवारीवर लक्ष टाकल्यास मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या साखळीत 73, म्हापशात 37, राजधानी पणजीत 53, कासारवर्णेत 19, कोलवाळेत 44, खोर्लीत 20, चिंबलमध्ये 79 ,शिवोलीत 15,पर्वरीत 19 रुग्ण उपचार घेत आहेत.

दक्षिण गोव्यात वास्कोत 363 तर कुठ्ठाळीत 369 रुग्ण आहेत.मूरगाव तालुक्यात सर्वाधिक रुग्ण असून मृतांमध्ये देखील मूरगाव तालुक्यातील रुग्ण मोठ्या संख्येने आहेत.बाळळीत 39, कुडतरीत 22, लोटलीत 29, धारबांदोडयात 32, फोंडयात 78 तर नावेलीत 23 रुग्ण असून राज्यातील रुग्ण आणि मृतांचा आकडा वाढत असल्याने विरोधक सरकारने कोविडवर श्वेत प्रतिका काढावी, अशी मागणी करत असले तरी सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याने परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.