
कोल्हापुर जिल्ह्यात कोरोनाचा वाढता समुह संसर्ग पाहता आता कोव्हिड-19 ची चाचणी पॉझीटिव्ह आलेल्या, अति सौम्य व लक्षणे नसलेल्या रूग्णांवर घरातच (गृह विलगीकरणात) उपचार करण्यात येणार आहेत. यासंदर्भात करवीर तालुक्यातील वडणगे गावाने पुढाकार घेतला असून असा निर्णय घेणारी वडणगे ग्रामपंचायत राज्यातील पहिलीच असण्याचा दावा करण्यात येत आहे.
अति सौम्य, लक्षणे नसलेल्या कोविड पॉझीटिव्ह रूग्णांना त्यांच्या घरात योग्य सुविधा उपलब्ध असल्यास त्यांच्या घरीच विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून देत जि.परिषदेचे मुख्य कार्य. अधिकारी अमन मित्तल यांनी परिपत्रक पाठविले आहे. यानुसार नोडल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी रूग्ण पॉझीटिव्ह आल्यानंतर तपासून तो अति सौम्य व लक्षणे नसलेला असल्याचे प्रमाणित करावे. वयोवृध्द रूग्ण (60 वर्षापेक्षा अधिकचे), इतर आजार, उच्च रक्तदाब, मधुमेह, ह्दयविकार, जुनाट यकृत, फुप्फूस, मूत्रपिंड अशा रूग्णांच्या वैद्यकीय तपासणीनंतर परवानगी द्यावी. ग्राम समितीने घरात स्वतंत्र व्यवस्था असल्याची खात्री करून प्रमाणित करावे. औषध गोळ्या तसेच नजिकच्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील काळजी केंद्राचा संपर्क क्रमांक रूग्णांच्या जबाबदार नातेवाईकांच्या ताब्यात देऊन, आरोग्य शिक्षण देवून घरी पाठवावे. दिवसातून दोनवेळा दूरध्वनीव्दारे रूग्णाची माहिती घ्यावी आदी मार्गदर्शक सुचनांचा यामध्ये समावेश आहे.दरम्यान येथील वडणगे ग्रामपंचायतीने यापूर्वीच गावात बैठक घेवून अशा प्रकारची उपचार यंत्रणा घरच्या घरीच करण्याचा निर्णय घेतला आहे.
रूग्णालयात ठेवल्यानंतर रुग्णांवर मानसिक दबाव येतो.पण घरीच उपचार मिळाल्यास हा दबाव आपोआप कमी होईल, या विचारातुनच गावात हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवाय पल्स ऑक्सिमीटर, थर्मामीटर, मल्टिव्हिटॅमीन, व्हिटॅमीन सी, ड्रायफ्रुट, पनीर अशी सर्व प्रकारची मदत ग्रामपंचायतीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, असे सरपंच सचिन चौगुले म्हणाले.
दरम्यान, यामध्ये रूग्णाची दररोजची नोंद करुन, सकस व योग्य आहार देण्यात येणार आहे.आरोग्य शिक्षणा बाबत व्हिडीओ कॉन्फरंसिंगच्या माध्यमातून संपर्क साधला जाणार आहे, असे डॉ.संदिप जे.पाटील यांनी सांगितले.






















































