
होमगार्डकडूनच अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी करणा-या कोल्हापूर शहर पथकातील दोन होमगार्डवर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन कारवाई करण्यात आली आहे. अनिकेत संताजी सरनाईक (वय- 23, होमगार्ड- सनद नं.1241, रा. शाहु कॉलनी प्लॉट नं.6, मंगळवार पेठ) आणि निलेश विठ्ठल सुतार (वय – 26, होमगार्ड-सनद नं. 1593, रा.भाड्याने, हनुमान गल्ली, टेंबलाईवाडी, ता. करवीर) अशी दोघांची नावे आहेत. या दोन होमगार्डवर तक्रारदार होमगार्डच्या तक्रारीवरुन जुना राजवाडा पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात येत होती.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडुन मिळालेल्या माहितीनुसार, 35 वर्षीय होमगार्ड (तक्रारदार) यांना होमगार्ड म्हणून 3 वर्ष उत्कृष्टसेवा बजावल्याबाबत कार्यालायकडून प्रमाणपत्र मिळवून देण्यासाठी जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या आवारात असलेल्या होमगार्ड कार्यालयातील दोन होमगार्डनी 17 जुलै रोजी अडीच हजार रुपये लाचेची मागणी केली होती. यासंदर्भात तक्रारीनंतर पडताळणी करुन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत, पोहेकॉ मनोज खोत, शरद पोरे, विकास माने, नवनाथ कदम, मयूर देसाई यांच्या पथकाने 20 जुलै रोजी सापळा रचला, मात्र कुणकुण लागल्याने या दोघांनी लाच घेतली नाही. अखेर तक्रारदाराच्या फिर्यादीवरून आज दोघांवर तक्रार दाखल करण्यात आली.






























































