
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दुपारी लागला. दहावीचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला असून संभाजीनगर विभागाचा निकाल 92 टक्के लागला आहे. या विभागातील बीड जिल्ह्याचा निकाल यंदा 91.24 लागला आहे. यंदा अनेक विद्यार्थ्यांचे चकीत करणारे निकाल समोर आले. माजलगाव तालुक्यातील एका शाळेच्या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 गुण मिळवत ‘मॅजिक फिगर’ गाठली आणि लक्ष वेधून घेतले आहे.
सर्वच विषयात ‘मॅजिक फिगर’ गाठणाऱ्या या विद्यार्थ्याचे नाव धनंजय नारायण नखाते असे आहे. धनंजय हा माजलगाव तालुक्यातील उमरी येथील रामेश्वर विद्यालयातील विद्यार्थी आहे. दहावीच्या परीक्षेत धनंजयने सर्वच 6 विषयात काठावरचे म्हणजेच 35 गुण मिळवले आहेत. त्याला एकूण 500 गुणांपैकी 175 गुण मिळाले आहेत.
शिक्षण मंडळाकडून दिला जाणारा ‘ग्रेस’ या माध्यमातून त्याला प्रत्येक विषयात 35 गुण मिळालेत. बुधवारी निकाल हाती आला तेव्हा सर्वच विषयात 35 चा आकडा पाहून अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.



























































