
राज्यात मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक मागास (एसईबीसी) या प्रवर्गातून 16 टक्के आरक्षण देण्यात आलेले आहे. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांसाठीच्या 10 टक्के आरक्षणाचा लाभ राज्य सरकारी नोकऱया वा शैक्षणिक प्रवेशासाठी घेता येणार नाही असे राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. केंद्र सरकारच्या मागास प्रवर्गाच्या यादीत मराठा समाजाचा समावेश नाही. त्यामुळे केंद्र सरकारच्या नोकऱयांसाठी आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकाच्या आरक्षणासाठी मात्र मराठा समाज पात्र आहे असेही राज्य सरकारने स्पष्ट केले आहे. याबाबत सामान्य प्रशासन विभागाने परिपत्रक काढले आहे.
राज्यात मराठा समाजासाठी सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्गातून राज्य शासकीय सेवा आणि शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी आरक्षण लागू करून तसा कायदा करण्यात आला. त्याच वेळी केंद्र सरकारने देशातील खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱयांमध्ये दहा टक्के आरक्षण दिले. राज्यात फेब्रुवारी 2019 पासून हे आरक्षण लागूही करण्यात आले. सध्या तलाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. राज्यातील विविध जिल्हा निवड समित्यांमार्फत ही प्रक्रिया सुरू आहे. त्यात सामाजिक आरक्षण प्रवर्गातील अनेक उमेदवार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकांच्या प्रमाणपत्राचा लाभ घेत असल्याच्या तक्रारी सरकारला प्राप्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हे स्पष्ट केले आहे.
केवळ खुल्या प्रवर्गातील घटकांनाच लाभ
त्यामुळे आता आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र देण्यापूर्वी सदर व्यक्ती राज्यात लागू असलेल्या सामाजिक आरक्षणात मोडते का याची खात्री तहसीलदारांना करावी लागणार आहे. केंद्रीय सेवांचा लाभ घेण्यासाठीचे आर्थिक दुर्बल घटकाचे प्रमाणपत्र राज्य सरकारी नोकऱयांतील भरतीत वापरले जाणार नाही याची दक्षता नियुक्ती प्राधिकाऱयांना घ्यावे लागेल. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बल घटकांसाठी शासकीय नोकऱयांमध्ये दहा टक्के आरक्षणाचा कायदा केला. ज्या घटकांना कोणत्याही मागास प्रवर्गातील आरक्षणाचा किंवा सोयी सुविधांचा फायदा दिला जात नाही अशा खुल्या प्रवर्गातील घटकांनाच मिळणार आहे.

























































