
बँकेत रोकड जमा करण्यासाठी दुचाकीवर चाललेल्या दिवाणजींना भरदिवसा अडवून रॉडने हल्ला करीत सव्वा तीन लाखांची रोकड चोरणाऱ्या तिघांना खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने अटक केले. त्यांच्याकडून दुचाकी आणि रोकड असा ३ लाख ८३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
थापा उर्फ विकास गोविंद कांबळे (वय 21, रा. लोहियानगर), मयुर सुरेश जाधव (वय 19) आणि अक्षय रमेश नवले (वय 19, दोघेही रा. जनता वसाहत ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी सुमंतीलाल ओस्तवाल (वय 69, रा. आकुर्डी प्राधिकरण) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओस्तवाल हे मार्केटयार्डातील रायकुमार नहार यांच्याकडे दिवाणजी म्हणून काम करतात. बुधवारी व्यवसायातून जमा झालेली 3 लाख 30 हजारांची रोकड बँकेत जमा करण्यासाठी ते दुचाकीवर चालले होते. त्यावेळी पाठीमागून दुचाकीवर आलेल्या थापा, मयूर आणि अक्षयने ओस्तवाल यांना दुचाकी आडवी लावली. तुला गाडी नीट चालविता येत नाही का, असे म्हणत त्यांनी त्यांच्याकडील पैशांची पिशवी हिसकाविली. त्यामुळे ओस्तवाल यांनी प्रतिकार केला असता, चोरट्यांनी त्यांच्यावर रॉडने हल्ला करून ते पसार झाले. याप्रकरणी खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने परिसरातील 25 सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरट्यांचा माग काढला. त्यानंतर दुचाकीची माहिती काढून तिघांना अटक केली. चौकशीत त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. ही कामगिरी पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाचे प्रमुख राजेंद्र मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, पोलीस नाईक रमेश चौधरी, हवालदार उदय काळभोर, सुनील चिखले, रमेश गरुड, मोहन येलपल्ले यांच्या पथकाने केली.
तेलाच्या डबा खरेदी केल्यानंतर केले प्लॅनिंग
लॉकडाउन कालावधीत एक महिन्यापुर्वी आरोपींनी मार्केटयार्डातील व्यावसायिक नहार यांच्याकडून तेलाचा डबा खरेदी केला होता. त्यावेळी नहार दिवाणजीकडे बँकेत पैसे भरण्यासाठी देत असताना आरोपींनी पाहिले. त्यानंतर तिघांनी दिवाणजी वयोवृद्ध असल्यामुळे त्यांना अडवून रक्कम लुटण्याचा डाव रचला. त्यासाठी आरोपींनी त्यांच्यावर दोन दिवस पाळत ठेवली. मात्र, दिवाणजी बँकेत पैसे भरण्यासाठी गेले नाही. बुधवारी दिवाणजी दुचाकीवर बँकेच्या दिशेने जात असताना तिघांनी त्यांच्या पाठलाग केला. त्यानंतर त्यांच्यावर हल्ला करुन रोकड लंपास केली होती.



























































