
अवघ्या जगाचे लक्ष लागलेल्या मुंबईत कोरोना आता चांगलाच आटोक्यात आला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 78 दिवसांवर तर सरासरी रुग्णवाढ 0.90 पर्यंत खाली आली आहे. यामुळे गेल्या आठ दिवसांत तब्बल 664 ठिकाणे ‘बंधमुक्त’ झाली आहेत. यामध्ये 650 इमारती-इमारतीचे भाग आणि 14 कंटेनमेंट झोनचा समावेश आहे. मुंबईत आता 617 कंटेनमेंट झोन असून 5519 इमारती-इमारतींचे भाग सील आहेत.
मुंबईत कोरोना रोखण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून युद्ध पातळीवर केल्या जाणार्या कामामुळे कोरोना नियंत्रणात आला आहे. यामध्ये कंटेनमेंट झोनसाठी निश्चित केलेल्या नियमांची कठोर अंमलबजावणी महत्त्वपूर्ण ठरत आहे. याशिवाय ‘चेस व्हायरस’ मोहीम, प्रभावी क्वारेंटाइन-निर्जंतुकीकरण यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात येत असल्याने प्रतिबंधित क्षेत्रेही कमी होत आहेत. रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीमध्येही वाढ होत असून 24 पैकी एच पूर्व वांद्रे – 155 दिवस, के पश्चिम : अंधेरी पश्चिम – 107 दिवस, एस : भांडूप -104 दिवस आणि एल : कुर्ला विभागात 104 दिवस डबलिंग रेट आहे. तसेच ई विभाग – भायखळा आणि एफ उत्तर माटुंग्यात डबलिंग रेट नव्वदीपार आहे. दरम्यान, मुंबईत 1 ऑगस्टपर्यंत एकूण रुग्णसंख्या 115346 वर गेली असली तरी यातील 87 हजार 906 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
बोरिवली, कांदिवली, अंधेरी पूर्वमध्ये आव्हान
पालिकेच्या आर मध्य म्हणजेच बोरिवलीमध्ये आता 768 इमारती सील आहेत. 19 जुलै रोजी या ठिकाणी ही संख्या 720 होती. ही आकडेवारी पाहता रुग्णवाढ कायम असल्याने कमी ठिकाणचे निर्बंध उठवल्याचे निदर्शनास येत आहे.
शिवाय के पूर्व म्हणजेच अंधेरी पूर्व आता 414 आणि आर दक्षिण म्हणजेच कांदिवलीत 462 इमारती-भाग अजूनही सील आहेत. त्यामुळे या ठिकाणी रुग्णवाढ रोखण्याचे पालिकेसमोर आव्हान आहे.
पालिकेच्या टी : मुलुंड प्रभागात 326, पी उत्तर : मालाडमध्ये 358, के पश्चिम : अंधेरी पश्चिममध्ये 303, एन : घाटकोपरमध्ये 358, आर उत्तर दहिसर : 281 आणि डी : ग्रँट रोडमध्ये 272 इमारती-इमारतीचे भाग सील आहेत.
अशी झाली सुधारणा
मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मुंबईत 3097 इमारती सील तर 696 कंटेनमेंट झोन होते. परंतु 3 जूनपासून लॉकडाऊन टप्याटप्याने खुले करण्यास आल्यामुळे प्रतिबंधित क्षेत्रांच्या आकडेवारीत वाढ झाली. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 798 प्रतिबंधित क्षेत्र, तर 4538 इमारती सील कराव्या लागल्या.
9 जुलै रोजी 751 कंटेनमेंट झोन तर 6597 सील इमारती होत्या. मात्र 18 जुलै रोजी मुंबईत स्थिती आणखी सुधारल्याने हा आकडा प्रतिबंधित क्षेत्र 708 आणि सील इमारतींची संख्या 6235 पर्यंत खाली आली आल्याने एकूण 405 क्षेत्र प्रतिबंधातून मुक्त झाली. तर 25 जुलै रोजी या प्रतिबंधित क्षेत्रात 77 ने तर सील इमारतींची संख्या 66 ने कमी झाली.






















































